३ केएम स्थानिक व्यावसायिकांची बाजारपेठ 

३ केएम स्थानिक व्यावसायिकांची बाजारपेठ 

पुणे - पुण्यातील व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या, त्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचविणाऱ्या, आपल्या आसपासच्या घडामोडींची ताजी माहिती देणाऱ्या ‘३km ॲप’चे दिमाखात उद्‌घाटन करण्यात आले. यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या उत्पादनांना हमखास ग्राहक तर मिळेलच, शिवाय ग्राहकांच्या घरापर्यंत वैविध्यपूर्ण वस्तूंची बाजारपेठ पोचणार आहे.

‘सकाळ’ आणि बल्ब अँड की यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेल्या ३km ॲपचे उद्‌घाटन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, उद्योजक आनंद परांजपे, लोकमान्य को-ऑपरेटिव्ह मल्टिपर्पज सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, तुळशीबाग व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन पंडित, एस. पी. फायनान्स अकॅडमीचे संस्थापक सचिन बामगुडे यांच्या हस्ते झाले. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, ‘डीसीएफ व्हेंचर’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी पोटलुरी, राज गुजर आदी या वेळी उपस्थित होते.

प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘आपण डेव्हिड आणि गोलिएथची कथा ऐकली असेल. गोलिएथ हा महाकाय असतो, पण त्याच्यात काही उणिवा असतात. त्या ओळखून डेव्हिडने त्याला संपविलेले असते. आपण त्यातले आहोत. म्हणजे मल्टिनॅशनल कंपन्या कितीही मोठ्या असल्या, तरी त्यांच्या म्हणून काही मर्यादा असतात. प्रत्येकाकडे काही बलस्थाने असतात आणि काही उणिवा असतात. आपण आपल्या उणिवा ओळखून बलस्थानाचा कसा उपयोग करून घेता येईल, त्यासाठी काय काय करायला हवे, कोणती साधने वापरली पाहिजेत, याचा विचार करायला हवा. तरच आपल्याला अस्तित्व टिकवून ठेवणे शक्य होईल. म्हणूनच समाजाच्या आणि ग्राहकांच्या गरजांचा अभ्यासही व्यावसायिकाला करावा लागेल. ग्राहकाला आणि त्याच्या कुटुंबाला वस्तू वा सेवा ही माफक दरात, खात्रीशीर आणि वेळेत हवी असते. त्या दृष्टीने व्यवसाय विकसित केला, तर व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यात विश्‍वासाचे नाते तयार होते. हे नाते तयार करण्यासाठी आणि ग्राहकाला आपल्या व्यवसायाशी कायमस्वरूपी बांधून ठेवण्यासाठी ३km ॲप व्यावसायिकांना उपयुक्त ठरेल. व्यवसाय म्हटला की आव्हानेही असतातच. म्हणूनच  भविष्यातील आव्हानांचा विचार हा वेळोवेळी करावा लागेल आणि त्यातून मार्ग काढून पुढे जावे लागेल. त्यासाठी ‘सकाळ’ नेहमीच तुमच्या  साथीला असेल.’’ 

फडणीस यांनी या वेळी या उपक्रमामागील भूमिका विशद केली. गुजर यांनी ॲपमुळे व्यावसायिक आणि ग्राहकांना होणाऱ्या लाभाची माहिती दिली. पोटलुरी म्हणाल्या, ‘‘डिजिटायझेशन ही काळाची गरज आहे आणि ३km ही एक नवी संधी आहे. प्रत्येक लहान व्यावसायिकांना ३km ॲप महत्त्वाचे ठरणार आहे. सुरुवातीला पुणे आणि नंतर महाराष्ट्रभरात हा उपक्रम राबविला जाणार आहे.’’

काय आहे ३km ॲप?
३km या ॲपमधून नागरिकांना त्यांच्या राहत्या जागेपासून नजीकच्या अंतरावरील ई-कॉमर्स, वस्तूंची घरपोच डिलिव्हरी व परिसरातील अत्यावश्यक माहिती मिळेल. छोट्या व घरगुती व्यावसायिकांचे सबलीकरण हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ३km चे वापरकर्ते त्यांच्या परिसरातील बातम्या वाचू शकतील. तसेच घराच्या तीन किलोमीटर परिघातील ॲपमध्ये नोंदणी असलेल्या व्यावसायिकांकडून वस्तू खरेदी करू शकतील. तुमच्या परिसरातील अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी व मनात येईल ती खरेदी अगदी कमी वेळेत करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.

सर्व पुणेकरांना जोडणारे ॲप
प्रत्येक पुणेकर हा ‘सकाळ’च्या ३km ॲपमुळे आपल्याजवळच्या स्थानिक व्यावसायिकांशी जोडला जाईल. यातून पुण्याची ऑनलाइन बाजारपेठ अस्तित्वात येईल. ग्राहक, व्यवसाय आणि बँकांसारख्या सेवांना हे ॲप खूप उपयुक्त ठरणार आहे, अशी भावना उद्‌घाटन सोहळ्याला उपस्थित व्यावसायिकांनी व्यक्त केली.

‘सकाळ’च्या ३km  ॲपचे उद्‌घाटन पुण्यातील निवडक व्यावसायिकांच्या उपस्थितीत झाले. पुण्यातील असंख्य व्यावसायिक या ॲपशी जोडले गेले आहेत. कोरोनाकाळात व्यवसायासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची गरज व्यक्त करतानाच या ॲपमुळे छोट्या व्यावसायिकांना खात्रीशीर बाजारपेठ मिळणार असल्याचा विश्‍वासही या व्यावसायिकांनी व्यक्त केला. येत्या काळात प्रत्येक पुणेकराला आणि छोट्या व्यावसायिकांना हे ॲप हक्काचे वाटेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.  

कोरोनाकाळात अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा फायदा झाला. परंतु यात छोट्या व्यावसायिकांना कुठेच स्थान नव्हते. त्याचा विचार करून ‘सकाळ’ने नवे ३km ॲप सुरू केले. त्यामुळे ही एक चळवळ ठरेल. यातून छोट्या व्यावसायिकांना विश्‍वासाबरोबर खात्रीशीर व्यवसायाची हमी मिळेल. ‘सकाळ’ जसा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झाला आहे, तसेच हे ॲपदेखील प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असेल, असा विश्‍वास वाटतो.
- आनंद परांजपे, उद्योजक

लॉकडाउन काळात घराजवळ दुकाने होती; पण बाहेर पडता येत नव्हते. बाजारपेठ एकप्रकारे डिस्कनेक्ट झाली होती. आता प्रत्येक पुणेकर ३kmच्या माध्यमातून स्थानिक बाजारपेठेशी जोडला जाणार आहे. छोट्या व्यावसायिकांना ‘सकाळ’मुळे एक विश्‍वासार्हता प्राप्त होणार आहे. ग्राहक, व्यवसाय आणि बँकांसारख्या सेवांना हे ॲप खूप उपयुक्त ठरणार आहे. 
- सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य को-ऑपरेटिव्ह मल्टिपर्पज सोसायटी

गर्दी ही तुळशीबागेचा आत्मा आहे. तरीही तुळशीबागेला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जावे लागेल, असा विचारही केला नव्हता. मात्र कोरोनामुळे जग बदलले, तसेच आम्हालाही बदलावे लागले. आम्ही ॲप तयार करण्याचा विचार करत होतो. पण त्यासाठी विश्‍वासार्हता महत्त्वाची असते. म्हणून ‘सकाळ’च्या ३km या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा आम्हाला आधार मिळाला. आता ‘सकाळ’ आणि तुळशीबाग हे नाते अधिक दृढ होणार आहे. 
- नितीन पंडित, अध्यक्ष,  तुळशीबाग व्यापारी संघटना 

‘सकाळ’ कोणतीही गोष्ट विश्‍वासार्हतेने करत आला आहे, त्यामुळे हा उपक्रमही लोक त्याच विश्‍वासाने स्वीकारतील. ऑनलाइन शॉपिंगद्वारे मी एकदा कुलर मागवला होता. तो सदोष होता. अनेकवेळा प्रयत्न करूनही त्या कंपनीने तो दुरुस्त करून दिला नाही. मात्र हे ३km ॲप पुणेकरांचे असणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला खरेदी केलेल्या वस्तूबाबत एक विश्‍वासही मिळणार आहे.
- सचिन बामगुडे, संस्थापक,  एस. पी. फायनान्स अकॅडमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com