उद्‌घाटनांचा फार्स!

उद्‌घाटनांचा फार्स!

पुणे - रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, पाण्याच्या टाक्‍या, भाजी मंडई, हॉस्पिटल आणि विविध विकासकामांची गतमहिन्यात उद्‌घाटने, लोकार्पण सोहळे करून वचनपूर्ती केल्याचे दावे करण्यात आले; मात्र यापैकी अनेक कामे अपूर्ण असल्याने केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्‌घाटनांचा फार्स केल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. 

जानेवारी महिन्यात निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याचा अंदाज असल्याने मतदारांसमोर विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले; मात्र आचारसंहितेपूर्वी कामे पूर्ण करण्याची खबरदारी घेण्यात आली नाही. डिसेंबरमध्ये उद्‌घाटने झालेले जवळपास ७५ प्रकल्पांपैकी निम्म्याहून अधिक प्रकल्प अर्धवट आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘प्रचारासाठी काहीही’ या सूत्राचा अवलंब करत संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही कामाबाबत शहानिशा न करता या कामांची उद्‌घाटने केली.

‘लर्निंग’ स्कूल अपूर्णच
प्रभागांमध्ये ‘ई-लर्निंग स्कूल’ उभारण्याचे नियोजन नगरसेवकांनी केले होते. एरंडवणा, वानवडी यासह चार ठिकाणी यांची भूमिपूजनेही केली; मात्र ही कामे रखडलेलीच आहेत.
उद्‌घाटन झाले; पुतळे कुठे आहेत?   

महापालिकेच्या इमारतीसमोरील उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. येथे शहराचे पहिले महापौर बाबूराव सणस आणि पहिले आयुक्त स. गो. बर्वे यांचे पुतळे बसविण्याचे नियोजन होते; मात्र ते बसविण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे पुतळे तातडीने बसविण्याची सूचना पवार यांनी संयोजकांना केली होती; मात्र त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.  

बारा कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन!
खडकवासला  : खडकवासला मतदारसंघात अनेक गावांमध्ये सुमारे बारा कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, तर तीन कोटी रुपयांची ही कामे पूर्ण होऊन त्यांची उद्‌घाटने केली आहेत.

आमदार भीमराव तापकीर यांनी ८० टक्के निधी रस्त्यांच्या कामासाठी ठेवला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून धायरी- नांदोशी- सणसनगर या रस्त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. खामगाव मावळ ते मोगरवाडी रस्त्यासाठी एक कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. 

गोगलवाडी, कल्याण, आर्वी, खामगाव मावळ, आगळंबे, घेरा सिंहगड येथील पाझर तलाव, वळण, साठवण बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे होणार आहेत. साकव पुलासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. कोंढणपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून २४ लाख रुपयांचे स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे. 

सिंहगड रस्त्यावरही धडाका
धायरी : सिंहगड रस्ता परिसरात गेल्या महिनाभरात विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन करण्यात आले. प्रभाग ५३ मध्ये पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते वीर बाजी पासलकर स्मारकाचे उद्‌घाटन नुकतेच झाले. आनंदनगर भागात आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते अंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. प्रभाग ५५ मध्ये विविध रस्ते, विविध विकासकामांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यात प्रामुख्याने विविध रस्ते, सभागृह, बायोगॅस या कामांचा समावेश आहे.  

औंधमध्ये उद््‌घाटनांची घाईच
औंध : परिसरातील प्रभाग क्रमांक आठ व नऊमधील विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घाईने उरकला जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे. औंध-बाणेर-बालेवाडी परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, अंतर्गत रस्ते, औंध येथील मॉडेल स्कूल, तसेच पाषाण येथील भाजीमंडई, डीपी रस्त्यांची कामे, तर बाणेरमधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नाना नानी पार्क इत्यादी कामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांतदेखील हे काम होऊ शकत असती मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कामे करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com