महाराष्ट्र जनुक कोशाच्या 'गोटुल' वेबसाईटचे उद्घाटन संपन्न

धोंडिबा कुंभार
शुक्रवार, 25 मे 2018

पिरंगुट (पुणे) : राज्यातील दुर्मिळ होत चाललेल्या पिकांच्या तसेच प्राण्यांच्या जुन्या वाणांची माहिती असलेली तसेच त्यांचे जतन व संवर्धन कार्यक्रमाची माहिती उपलब्ध करणाऱ्या गोटुल या वेबसाईटचे उद्घाटन नुकतेच झाले.

पिरंगुट (पुणे) : राज्यातील दुर्मिळ होत चाललेल्या पिकांच्या तसेच प्राण्यांच्या जुन्या वाणांची माहिती असलेली तसेच त्यांचे जतन व संवर्धन कार्यक्रमाची माहिती उपलब्ध करणाऱ्या गोटुल या वेबसाईटचे उद्घाटन नुकतेच झाले.

महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमांतर्गत पर्यावरण शिक्षण केंद्राच्यावतीने पत्रकार भवन येथे या वेबसाईटचे उद्घाटन विदर्भातील धीवर समुदायातील महिला कार्यकर्त्या शालूताई कोल्हे यांच्या हस्ते झाले. राज्यातील पिकांमधील वाणांची विविधता, गवताळ भाग आणि गोड्या पाण्यातील जैवविविधता, समुद्री स्पंज, सह्याद्रीतील दुर्मिळ वनस्पती, जंगल परिसर पुनर्निर्माण आणि जैवविविधता शिक्षण आदींची माहिती या वेबसाईटवर उपलब्ध केली आहे.

जैवविविधतेसाठी सुरु असलेले प्रयत्न, संवर्धन आणि विकासाचे नवीन विज्ञान आणि अर्थशास्त्राची मांडणी आदी माहितीही या वेबसाईटवर मिळणार आहे. लोकसहभागातून संवर्धनाच्या माहितीची मुक्त देवाणघेवाण आणि शिक्षण यासाठी विकसित होत असलेली www.gotul.org.in ही मराठीतील वेबसाईट आहे.                  

यावेळी प्रदर्शनात भात, ज्वारी, मका, मिरची, नाचणी, वाल आदी  पिकांच्या तीनशेहून अधिक वाण मांडले होते. संशोधकांच्या परिसंवादामध्ये संजय पाटील , प्रसाद देशपांडे  ,विजय सांबारे  अविल बोरकर , माधव ताटे , विलास पाटील सहभागी झाले होते.  प्रा. एस.आर. यादव यांनी निसर्ग संवर्धनासंबंधी ‘मला जेवढं उपयोगी तेवढच मी वाचवेन ’ ही संकुचित मानसिकता असून चालेल का? असा अंतर्मुख करणारा प्रश्न उपस्थित केला. कौस्तुभ पांढरीपांडे यांनी सांगितले की ,  आपण जलयुक्त शिवार तर राबवितो परंतु तृणयुक्त शिवाराचं काय? असा प्रश्न उपस्थित केला.       

शांताराम बापू यांनी आदिवासी, दलित, भूमिहीनांना मिळालेल्या ओसाड वनजमिनीवर पुनर्निर्माणाचे सर्जनशील काम हे चळवळीतील कार्यकर्त्यांनी  समजून घेण्याचे आवाहन केले. शालू कोल्हे यांनी भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ संस्थेसोबत मासेमारी समुदायातील महिलांनी संघटीत होत गोड्यापाण्यातील मुलकी माशांच्या जाती  संवर्धनाच्या प्रयत्नांचा अनुभव मांडला. डॉ. बबन इंगोले यांनी ग्लीओना थोमसी ही नवीन स्पोंज समुद्री प्रजाती मालवण येथे शोधल्याची माहिती दिली.  डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी स्पोंजच्या संवर्धनासाठी स्थानिक मासेमार  आणि शाळांमधील विद्यार्थी यांच्यासोबत सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सतीश आवटे यांनी पर्यावरण शिक्षण केंद्रातर्फे राज्यभरातील शाळांमध्ये राबवित असलेले प्रकल्प , साधने ,खर्च आणि त्यातून मुलांना मिळणाऱ्या शिक्षणाचा राज्यव्यापी अभ्यासाबाबत माहिती दिली. 

Web Title: inauguration of gotool website of maharashtra gene bank