राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते जेनेटिक प्रयोगशाळेचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Governor Bhagat Singh Koshari

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते जेनेटिक प्रयोगशाळेचे उद्‌घाटन

पुणे : ‘‘पूर्वीच्याकाळी वैद्य प्राचीन वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून स्वत: निदान करायचे आणि स्वत:च औषधे बनवायचे. आता आधुनिक उपचार पद्धतीत औषध निर्माते, निदान प्रयोगशाळा, विशेषज्ञ डॉक्टर्स, औषधे, उपचार साधने यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा अशी एक साखळी आहे. जनुकविज्ञानाच्या (जेनेटिक सायन्स) माध्यमातून केवळ आजारांचे निदान करणे एवढेच नाही तर आजारांची कारणे आणि त्यावरील उपचार शोधणे शक्य झाले आहे,’’ असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राने उभारलेल्या ‘डॉ. घारपुरे स्मृती जेनेटिक प्रयोगशाळा व कर्करोग संशोधन केंद्रा’चे (जीन हेल्थ) उद्‌घाटन कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, इंडियन ड्रग रिसर्च असोसिएशन ॲण्ड लॅबोरेटरीचे अध्यक्ष सुहास जोशी, विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी उपस्थित होते. कोश्यारी म्हणाले, ‘‘सर्व नवीन ज्ञान हे अंतिमत: प्रयोगशाळेत निर्माण होते. आरोग्य क्षेत्रातील संशोधन, आजारांचा शोध, रोगनिदान आणि उपचारपद्धतीचा शोध ही  तपश्चर्या आणि खूप कालावधीची प्रक्रिया आहे. त्यासाठी मोठा संयम, सहकार्य, समर्पण याची आवश्यकता असते. जनुकीय विज्ञानाच्या क्षेत्रात सखोल ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी हे आवश्यक आहे.’’

यावेळी डॉ. कानिटकर म्हणाल्या, ‘‘शिक्षण, सार्वजनिक आरोग्य शिक्षण आणि आरोग्यासाठी संशोधन याबाबी एकत्र कशा करता येईल, हा दृष्टिकोन ठेवून ‘मॉलेक्युलर डायग्नॉस्टिक इन जेनेटिक’ लॅबची उभारणी केली आहे. जनुक विज्ञान विषयात क्षमता बांधणी व अभ्यासक्रम राबवणे आणि त्याचबरोबर संशोधनाचे महत्त्वपूर्ण काम येथे केले जाईल. ही प्रयोगशाळा राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि शासकीय रुग्णालयांना या क्षेत्रातील निदानासाठी उपलब्ध असेल.’’ आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नॅशनल एड्स संशोधन संस्था (नारी) तसेच अन्य संस्थांशी सामंजस्य करारांचे आदान-प्रदान करण्यात आले. ‘मेंटल हेल्थ ॲण्ड नॉर्मल्सी ऑगमेंटेशन सिस्टीम’ अर्थात ‘मानस ॲप’चे उद्‌घाटनही याप्रसंगी करण्यात आले.