माळीणच्या विद्यार्थ्यांसाठी नवी पहाट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

‘सकाळ रिलीफ फंडा’तून उभारलेल्या वसतिगृहाचे उद्‌घाटन १८ ऑगस्टला होणार 

पुणे - निसर्गाच्या सान्निध्यात डोंगरपायथ्याशी वसलेल्या माळीणच्या गावकऱ्यांसाठी ३० जुलै २०१४ ची पहाट अंधकारमय ठरली... डोंगरकडा कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यांचा संसार सावरण्यासाठी सरकारबरोबरच स्वयंसेवी संस्था धावून आल्या. ‘सकाळ रिलीफ फंडा’नेही मदतीचा हात पुढे करून माळीण परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सव्वा कोटी रुपये खर्च करून वसतिगृह उभारले आहे. या वसतिगृहाच्या इमारतीचे उद्‌घाटन रविवारी (ता. १८) होणार आहे.    

‘सकाळ’च्या वाचकांनी ‘सकाळ रिलीफ फंडा’स दिलेल्या मदतीच्या पाठबळावर घोडेगाव येथे हे वसतिगृह उभारले आहे. जनता विद्या मंदिर येथे सकाळी ११ वाजता उद्‌घाटन समारंभ होणार आहे. या वसतिगृहात शंभराहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासाची मोफत सोय होणार आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यात वसतिगृहाचे मोठे योगदान राहणार आहे. आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ या शिक्षण संस्थेने वसतिगृहासाठी विनामूल्य जागा दिली आहे. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अजित काळे, जयसिंगराव काळे यांच्यासह इतर विश्‍वस्तांनी सहकार्य केले आहे. वसतिगृहाच्या इमारतीचे उद्‌घाटन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप वळसे-पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The inauguration will be held on August 18 Sakal Relief Fund for students of Malin