परदेशातील पीएचडीसाठी प्रोत्साहन

संतोष शाळिग्राम  
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे - प्राध्यापकांनो, परदेशी विद्यापीठात जाऊन पीएचडी करायची असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) एक हजार प्राध्यापकांना जागतिक दर्जाच्या ऑक्‍सफर्ड, स्टॅनफर्डसारख्या सर्वोत्कृष्ट परदेशी विद्यापीठांत पीएचडी करण्यासाठी संधी देणार आहे. त्यासाठी २५ हजार रुपये महिना पाठ्यवृत्तीदेखील दिली जाणार आहे.

पुणे - प्राध्यापकांनो, परदेशी विद्यापीठात जाऊन पीएचडी करायची असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) एक हजार प्राध्यापकांना जागतिक दर्जाच्या ऑक्‍सफर्ड, स्टॅनफर्डसारख्या सर्वोत्कृष्ट परदेशी विद्यापीठांत पीएचडी करण्यासाठी संधी देणार आहे. त्यासाठी २५ हजार रुपये महिना पाठ्यवृत्तीदेखील दिली जाणार आहे.

देशातील प्राध्यापकाला परदेशी जाऊन संशोधन करण्याची संधी देण्याबरोबरच त्यांनी तेथे मिळविलेल्या ज्ञानाचा देशातील विद्यार्थी आणि शिक्षण संस्थांच्या गुणवत्तावाढीसाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने परिषदेने ही योजना तयार केली आहे. याद्वारे प्राध्यापकांना परदेशातील विद्यापीठांकडूनही पाठ्यवृत्ती मिळवून देण्याचा प्रयत्न परिषद करणार आहे. प्राध्यापकांना पगारी रजा घेऊन पीएचडी करण्यासाठी जाता येईल. 

‘एआयसीटीई’च्या संशोधन, संस्था, प्राध्यापक विकास विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप मालखेडे यांनी ‘सकाळ’ला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्याची संधी यानिमित्ताने मिळेल. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनादेखील होईल. चार वर्षांच्या काळात त्यांना हे काम पूर्ण करावे लागेल. त्यासाठी परिषद दरमहा २५ हजार रुपये पाठ्यवृत्ती देणार आहे; तसेच परदेशी विद्यापीठाकडूनही त्यांना एक लाख रुपये दरमहा पाठ्यवृत्ती मिळेल. मात्र, त्यासाठी प्राध्यापकांचे वय ४०पेक्षा कमी असावे.’’

देशभरातून एक हजार प्राध्यापकांना जगातील सर्वोत्कृष्ट पाचशे विद्यापीठांमध्ये पीएचडी करता येईल. तेथे प्रवेश घेण्यासाठी प्राध्यापकांनी प्रयत्न करायचा आहे. त्यांचा प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर पुढील मदत परिषदेकडून दिली जाईल. प्राध्यापकांना पीएचडी करण्यासाठी परदेशी जाता यावे म्हणून त्यांना चार वर्षांची सवलत म्हणजे आधीची नोकरी कायम ठेवण्याचा धारणाधिकार (लीन) मिळावा, यासाठी त्यांच्या महाविद्यालयांना परिषदेमार्फत सक्ती 

केली जाणार आहे. या काळात महाविद्यालयांनी त्यांचे वेतन सुरू ठेवणे अपेक्षित आहे, असे डॉ. मालखेडे यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह देशात अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुकला आणि तंत्र शिक्षण आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सात लाख प्राध्यापक आहेत. ते योजनेसाठी लगेचच अर्ज करू शकतील. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ई-मेलद्वारे योजनेची माहिती पाठविली जाईल. त्यांना परदेशातील पीएचडीबाबत मार्गदर्शन करण्यास इंटरनॅशनल रिलेशनशिप सेलही सुरू केला जाईल, असे त्यांनी  सांगितले.

अमेरिका, ब्रिटन, युरोप, जर्मनी, ऑस्ट्रेलिया येथे पीएचडी करून तेथे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे आपल्या देशातील तंत्र शिक्षण क्षेत्र गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी एआयसीटीई आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
- डॉ. दिलीप मालखेडे,  प्रमुख, प्राध्यापक विकास विभाग, एआयसीटीई

Web Title: Incentives for foreign PhD