नोटांसंदर्भात प्राप्तिकर खात्याची हेल्पलाइन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पिंपरी - काळा पैसा व जुन्या-नव्या नोटांसंदर्भात प्राप्तिकर खात्याच्या हेल्पलाइनवर थेट नागरिकांकडूनच माहिती मिळत आहे. या माध्यमातून गेल्या 40 दिवसांत प्राप्तिकर खात्याकडे सुमारे दीड हजार तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती प्राप्तिकर खात्याच्या सूत्रांनी "सकाळ'ला दिली.

पिंपरी - काळा पैसा व जुन्या-नव्या नोटांसंदर्भात प्राप्तिकर खात्याच्या हेल्पलाइनवर थेट नागरिकांकडूनच माहिती मिळत आहे. या माध्यमातून गेल्या 40 दिवसांत प्राप्तिकर खात्याकडे सुमारे दीड हजार तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती प्राप्तिकर खात्याच्या सूत्रांनी "सकाळ'ला दिली.

केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर प्राप्तिकर खात्याने काळा पैसा आणि जुन्या नोटांसदर्भातील व्यवहारांची माहिती घेण्यासाठी एक महिन्यापूर्वी स्वतंत्र कक्ष सुरू केला. या कक्षात फोन व ई-मेलद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर काळा पैसा आणि नोटांच्या संदर्भातील माहिती मोठ्या प्रमाणात नागरिकांनीच प्राप्तिकर खात्याला दिली. या कक्षात काळा पैसा आणि नोटांसंदर्भात दररोज सुमारे 30 तक्रारी येत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

नागरिकांकडून येणाऱ्या माहितीची पूर्णपणे शहानिशा करून त्याआधारे कारवाई करण्यात येत आहे. याखेरीज काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी प्राप्तिकर खात्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. त्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे कारवाई होत आहे.

काळा पैसा किंवा नोटांसंदर्भात नागरिकांनी कोणतीही माहिती प्राप्तिकर खात्याला कळविली, की त्यानंतर त्याची शहानिशा करून पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात येते. बऱ्याचदा प्राप्तिकर खात्याला फोन करून माहिती देणारी मंडळी पूर्ण माहिती देत नाहीत, त्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

नागरिकांना आवाहन...
काळा पैसा आणि नोटांसंदर्भात तक्रार करण्यासाठी प्राप्तिकर विभागाचा स्वतंत्र सेल कार्यरत आहे. कोणत्या ठिकाणी चुकीचे आर्थिक व्यवहार होत आहेत, नोटा किंवा काळ्या पैशासंदर्भात माहिती असल्यास प्राप्तिकर विभागाला माहिती देण्यासाठी 8002335212 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. याखेरिज 7066768062 या क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे. या दोन्ही क्रमांकांवर 24 तास तक्रार नोंदवता येईल. तसेच, itblackmoney@gmail.com या ई-मेलवरही तक्रार करता येईल.

Web Title: Income tax Account Helpline for currency