
पुणे : पोस्टाने पाठविले जाणार १२ लाख मिळकतींचे बिल
पुणे : आगामी वर्षात मिळकतकर विभागाकडून तब्बल २१०० कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचे उद्दिष्ट असल्याने प्रशासनाने त्यासाठी आत्ता पासूनच कंबर कसली आहे. २०२२-२३ या वर्षातील कर नागरिकांनी भरावा यासाठी समाविष्ट २३ गावांसह संपूर्ण शहरातील १२ मिळकतधारकांना पोस्टाने मिळकतकराची बिले पाठवली जाणार आहेत. हे वितरण २५ मार्च पासून सुरू होईल. महापालिकेकडून दरवर्षी पोस्टाद्वारे मिळकतकरांच्या बिलांचे वाटप केले जाते.
यंदाच्या वर्षी नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावातील नागरिकांना बिल पाठवले जाणार आहे. यापूर्वी गावांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बिलांचे प्रत्यक्ष वाटप केले जात होते. ग्रामपंचायतींकडून महापालिकेला जी माहिती मिळाली आहे, त्याच पत्त्यावर बिल पाठविले जाणार आहे. पोस्टाने पाठविलेल्या बिलांमधील सुमारे दोन टक्के बिलांचे पत्ते चुकीची असण्याची शक्यता आहे. पण ९८ टक्के नागरिकांना याचा फायदा होत आहे. एका बिलासाठी महापालिकेला तीन रुपये २० पैसे इतका खर्च येत आहे.
‘‘एकूण १२ लाख मिळकतींना पोस्टाद्वारे बिल पाठविण्यात येईल. त्यात ज्या नागरिकांची कोणतीही थकबाकी नाही अशा ९ लाख जणांना पहिल्या टप्प्यात बिल पाठवले जाईल. ज्या ३ लाख जणांची थकबाकी आहे त्यांना ३१ मार्च पर्यंत थकबाकी भरण्याची मुदत असल्याने त्यांना एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बिल पत्त्यावर मिळतील.’’
- विलास कानडे, प्रमुख, मिळकतकर विभाग
Web Title: Income Tax Department 12 Lakh Income Tax Bill Sent By Post Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..