प्राप्तिकर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पुणे - अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नती, ४० टक्के रिक्त पदांचा अनुशेष भरणे, भरती प्रक्रियेसाठीची नियमावली करणे, नवीन मंजूर पदांवर पदोन्नती देणे, पायाभूत सुविधांचा अभाव अशा विविध मागण्यांसाठी प्राप्तिकर विभाग राजपत्रित अधिकारी संघटना आणि प्राप्तिकर विभाग कर्मचारी संघटनेच्या संयुक्त कृती समितीतर्फे पुणे स्टेशन येथील प्राप्तिकर विभागाच्या मुख्य कार्यालयात एकदिवसीय धरणे आंदोलन केले.

यासंदर्भात प्राप्तिकर विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष आणि संयुक्त प्राप्तिकर आयुक्त अजय कुलकर्णी म्हणाले, ‘‘देशात ६५ हजार मनुष्यबळाची आवश्‍यकता असताना केवळ ३९ हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून सर्व पदांवर पदोन्नती केली गेलेली नाही. केंद्र सरकारने मंजूर पदांवरही नियुक्‍त्या केलेल्या नाहीत. त्यासाठीची नियमावली जाहीर केली नाही. २००४ मध्ये लागू केलेल्या पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळालेली नाही. तसेच, कंत्राटी कामगारांना कायम सेवेत रुजू करून घ्यावेत. छाप्यासाठी वाहने, स्टोअररूम, संगणक, प्रिंटर, मालकीची इमारती, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अशा पायाभूत सुविधा पुरवाव्यात, या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. येत्या २७ जून रोजी दिल्ली येथे कृती समितीचे पदाधिकारी व अर्थमंत्री यांच्या बैठकीत मागण्या पूर्ण न झाल्यास देशव्यापी आंदोलन केले जाईल.’’ या वेळी अधिकारी संघटनेचे महासचिव जयवंत चव्हाण, कर्मचारी संघटनेचे महासचिव शरद मुऱ्हे यांच्यासह पुणे विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: income tax employee agitation