बिलांची छपाई न झाल्याने यंदा मिळकतकर ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

कोरोनामुळे पुढील आर्थिक वर्षाची म्हणजे, एक एप्रिलनंतरच्या (२०२०-२१) मिळकतकराच्या बिलांची छपाई न झाल्याने यंदा ती मिळकतधारकांना ‘ई-मेल’ आणि ‘एसएमएस’द्वारे पोचविण्यात येणार आहेत. ३१ मेपर्यंत कराची पूर्ण रक्कम भरणाऱ्या मिळकतधारकांना ५ ते १० टक्के सवलत मिळेल. त्यामुळे या मुदतीत बिले भरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

पुणे - कोरोनामुळे पुढील आर्थिक वर्षाची म्हणजे, एक एप्रिलनंतरच्या (२०२०-२१) मिळकतकराच्या बिलांची छपाई न झाल्याने यंदा ती मिळकतधारकांना ‘ई-मेल’ आणि ‘एसएमएस’द्वारे पोचविण्यात येणार आहेत. ३१ मेपर्यंत कराची पूर्ण रक्कम भरणाऱ्या मिळकतधारकांना ५ ते १० टक्के सवलत मिळेल. त्यामुळे या मुदतीत बिले भरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आर्थिक वर्ष संपण्याआधीच नव्या वर्षातील मिळकतकराची बिले मिळकतधारकांच्या घरी पोचविण्याची व्यवस्था महापालिकेकडून केली जाते. त्यानंतर साधारणपणे १० एप्रिलपर्यंत बहुतांशी मिळकतधारकांना बिले मिळतात. त्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत म्हणजे, एप्रिल आणि मेमध्ये कराची रक्कम भरणाऱ्यांना ५ ते दहा टक्के सवलत दिली जाते. त्यात २५ हजार रुपयांपर्यंत बिलाची रक्कम असलेल्यांना १० आणि त्यापेक्षा अधिक बिलाच्या रकमेवर पाच टक्के सवलत आहे. मात्र, कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन असल्याने बिलांची छपाई झालेली नाही, असे या विभागप्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. 

शहरातील सुमारे १० लाख ५० हजारांपैकी साडेसात लाख मिळकतधारकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल महापालिकेकडे आहेत. त्याशिवाय महापालिकेच्या www.punecorporation.org आणि propertytax.punecorporation.org  या संकेतस्थळांवर बिलांची प्रत घेता येणार आहे. तसेच, ‘लॉकडाऊन’ संपुष्टात आल्यानंतर बिले घरी मिळतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income tax online this year because of no printing of bills