मिळकतकराचा तिढा कायम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

मार्केट यार्डातील गाळेधारकांची प्रशासनाशी चर्चा करूनही तोडगा निघेना

मार्केट यार्डातील गाळेधारकांची प्रशासनाशी चर्चा करूनही तोडगा निघेना

पुणे - मार्केट यार्डमधील किराणा भुसार मालाच्या बाजारातील गाळेधारकांच्या मिळकतकराचा तिढा कधी सुटणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाशी अनेकदा चर्चा करूनही यावर तोडगा निघाला नाही. दि पूना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले हे नगरसेवक म्हणून निवडून आले असून, पुन्हा एकदा या प्रश्‍नावर चर्चा सुरू झाली आहे.
नाना व भवानी पेठेतील किराणा भुसार मालाचा घाऊक बाजार मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थलांतर झाला. या बाजारात मिळालेल्या भूखंडावर व्यापाऱ्यांनी गाळे उभारण्यास सुरवात केली.

ज्यांचे गाळे लवकर बांधले गेले, त्यांना कमी मिळकतकर लागू झाला. सर्व व्यापाऱ्यांना एकाच आकाराचे भूखंड दिले गेले; परंतु बांधकाम पूर्ण होण्याचा कालावधी वेगवेगळा असल्याने काहींना जास्त, तर काहींना कमी मिळकतकराची बिले येऊ लागली. हा कर एकसारखा नसल्याने काही व्यापाऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला आहे. सध्या ४० व्यापाऱ्यांची न्यायालयात महापालिकेविरुद्ध लढाई सुरू आहे.

सर्व गाळेधारकांना एकसारखाच मिळकत कर लागू करावा, अशी मागणी दि पूना मर्चंट्‌स चेंबरने केली आहे. यासंदर्भात चेंबरचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी तत्कालीन महापौर, आयुक्त आणि इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे; परंतु त्यातून तोडगा निघाला नाही. मिळकतकर न भरल्याने काहींच्या मिळकतकरावर व्याजही वाढत गेले आहे. महापालिकेने गाळेधारकांना मिळकतकर वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रश्‍नावर चर्चा सुरू झाली आहे. चेंबरच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही याबाबत मार्ग काढण्याचे ठरले. महापालिकेच्या मिळकतकर विभागप्रमुखांची व्यापाऱ्यांनी भेट घेतली. या प्रश्‍नावर तोडगा काढा, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. त्या वेळी लवकरच संयुक्त बैठक आयोजित करू, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

चेंबरचे विद्यमान अध्यक्ष चोरबेले हे भाजपचे नगरसेवक म्हणून मार्केट यार्ड भागातून निवडून आले आहेत. त्यांच्या पक्षाचे महापालिकेत बहुमत असल्याने पुढील निर्णय घेण्यात काही अडचण येणार नाही, असे चित्र आहे. 

प्रत्येक गाळेधारकांकडून २६०० रुपये इतका मिळकतकर येणे अपेक्षित आहे; परंतु प्रत्येक गाळेधारकाला वेगवेगळा कर येत आहे. महापालिका प्रशासनाबरोबर हा प्रश्‍न सोडविण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. संयुक्त बैठकीत मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.
- प्रवीण चोरबेले, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्‌स चेंबर

Web Title: income tax problem