तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियासाठी आलेल्या महिलांची गैरसोय

प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते
Talegaon Dhamdhere PHC
Talegaon Dhamdhere PHCSakal

तळेगाव ढमढेरे - तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून, शस्त्रक्रिया न करताच सर्व महिलांना अचानक घरी जावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला आहे. तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील सुमारे ३० महिला सहभागी झाल्या होत्या.

आज सकाळपासून उपाशीपोटी असलेल्या महिलांना शस्त्रक्रियेपूर्वी सलाईन भरण्यात आली होती. दुपारी दीड वाजता शस्त्रक्रिया होणार होती, त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी अर्चना कांबळे, आरोग्य सहायक कुसुम निघुट, आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. परंतु अचानक शस्त्रक्रियेसाठी येणारे सर्जन डॉ.तुकाराम मोटे यांना अडचण निर्माण झाल्याने आज शस्त्रक्रिया होणार नाही पुढची तारीख द्या असा निरोप येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना डॉ मोटे यांचेकडून आला. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची एकच धावपळ झाली.

"शस्त्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण झाली परंतु सर्जनच्या अडचणींमुळे अचानक शस्त्रक्रिया होणार नाही पुढील तारीख कळवू असा निरोप वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांनी महिलांना देताच महिलांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी अर्चना कांबळे यांची या संदर्भात भेट घेतली असता, पुढील शस्त्रक्रियेची तारीख महिलांना लवकरच कळवू, उन्हाळी सुट्टीमुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी महिलांनी भरपूर नाव नोंदणी केली असल्याचे डॉक्टर कांबळे यांनी दैनिक सकाळशी बोलताना सांगितले.

यासंदर्भात शिरूर तालुका संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष संदीपअण्णा ढमढेरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या महिलांच्या गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली. महिलांनी त्यांच्याकडे येथील परिस्थितीची व गैरसोईची माहिती सांगितली. ऐनवेळी घरी जाण्याचे सांगितल्यावर मनस्ताप व गैरसोय झाल्याचे यावेळी महिलांनी सांगितले. पुढील शस्त्रक्रिया करताना नियोजनानुसार करावी, एखादा सर्जन येणार नसेल तर त्याच्या जागी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी करून पुढील शिबिरात महिलांची गैरसोय होऊ नये याची आरोग्य विभागाने जबाबदारी घ्यावी, अशी सूचना श्री ढमढेरे यांनी केली."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com