पुणे ः लोहगावमधील सर्व्हे नंबर 82, कर्मभूमीनगरमध्ये डेंगीचे रुग्ण प्रत्येक घरात सापडत आहेत. आतापर्यंत सुमारे 50 जणांना डेंगीची लागण झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिकेने या परिसरात त्वरित सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
लोहगावचा परिसर झपाट्याने वाढत आहे. महापालिकेत समावेश झाल्यानंतरदेखील प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
येथील स्थानिक रहिवासी गौतमकुमार म्हणाले, की गेल्या दीड महिन्यापासून कर्मभूमी सोसायटीच्या परिसरात डेंगीने थैमान घातले आहे. दवाखान्यात प्रत्येकाला सुमारे 60-70 हजार रुपये खर्च येत आहे. कुणाचा तरी जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासन यात लक्ष घालणार का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
कर्मभूमीनगर परिसरात महापालिकेतर्फे मशिनद्वारे धूर फवारणी, तसेच औषध फवारणी करून परिसर डेंगीमुक्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांचे केली आहे.
""कर्मभूमीनगर परिसरात औषध फवारणी सुरू आहे. प्रत्यक्ष परिसराची पाहणी करून नागरिकांच्या प्रबोधनासह आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येतील.'' - डॉ. तिरुपती पांचाळ, वैद्यकीय अधिकारी, महापालिका