पुणे शहरात उन्हाळ्यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या मागणी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milk Product

पुणे शहरात हळूहळू उन्हाचा तडाखा वाढत असून दूधापासून तयार करण्यात येणाऱ्या थंड पेयांना चांगलीच मागणी वाढली आहे.

Dairy Product : उन्हाळ्यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या मागणी वाढ

कात्रज - शहरात हळूहळू उन्हाचा तडाखा वाढत असून दूधापासून तयार करण्यात येणाऱ्या थंड पेयांना चांगलीच मागणी वाढली आहे. तुलनेने दही, ताक, लस्सी, आम्रखंड, श्रीखंड, सुगंधी दूधाच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागतो. त्यामुळे या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे डेअरी व्यावसायिक सांगतात. कोरोनानंतर शीतपेये सोडून लोकांचा कल हा थंड दुग्धजन्य पदार्थाकडे वाढला असल्याचे दिसून येते.

आईस्क्रीममध्ये बटरस्कॉच, मँगो, पेरु, व्हॅनिला असे विविध प्रकार आणि लस्सीमध्ये साधी लस्सी आणि मँगो लस्सी तर ताकामध्ये मसाला ताक, जीरा ताकासारख्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे दुधालाही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. याचा फायदा दूध व्यावसायिकांनाही होत असल्याचे दिसून येत आहे.

प्रतिक्रिया

सध्याच्या परिस्थितीत दुधाच्या मागणीत वाढ होण्याचे मुख्य कारण आहे की, प्रत्येक माणसाला शुद्ध दूधाची आवश्यकता असून लोकांना त्याचे महत्व कळाले आहे. दुधामुळे माणसाचे आरोग्य सुधारते आणि दुधाच्या सेवनामुळे आरोग्याला हानी होत नाही. दुधामध्ये रोगप्रतिकारकशक्ती असते. त्यामुळे लोक आता उन्हाच्या कडाक्यात शीतपेयांऐवजी ताक, लस्सी, सुगंधी दूध अशा प्रकारची पेये पिण्यावर भर देताना दिसत आहेत.

- व्यवस्थापक, संतोष वायबसे, यश अॅग्रो डेअरी

कात्रज डेअरीची उत्पादने ही दर्जेदार आहेत. त्याचबरोबर उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागल्याने ग्राहकांची मागणी वाढली आहे. मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यात आम्हाला उर्वरित नऊ महिन्यातील विक्री अपेक्षित असते.

- केशर पवार, अध्यक्ष, कात्रज डेअरी, संचालक महानंद डेअरी

कोरोनानंतर लोकांचा कल कोकपासून बनविण्यात आलेली शीतपेये सोडून थंड दुग्धजन्य पेये ताक, लस्सी, सुगंधी दूध ही पिण्याकडे वाढला आहे. गेल्या तीन वर्षापासून प्रतिवर्षी विक्रीत २० टक्के वाढ झालेली आहे. यावर्षीही उन्हाळ्याच्या दिवसात आम्हाला २० ते ३० टक्के वाढ अपेक्षित असून त्यादृष्टीने ग्राहकांच्या खरेदीत वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर, गुढीपाढव्याच्या मुहूर्तावार श्रीखंडाच्या विक्रीत विक्रमी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

- निखिल चितळे, भागीदार, चितळे डेअरी.

तक्ता

थंड पदार्थांची कात्रज डेअरीची मार्च महिन्यातील प्रतिदिन सरासरी अपेक्षित विक्री

दही-५ टन

आईस्क्रीम-७ टन

साधे ताक-८० हजार पिशव्या (४० हजार लिटर)

जिरा ताक-४० हजार पिशव्या (८ हजार लिटर)

लस्सी-२० हजार पॅकेट

पनीर-६०० किलो

श्रीखंड-७०० किलो

आम्रखंड-६०० किलो

सुगंधी दूध-१०,००० पिशव्या (२००० लिटर)