प्लीज लोकलच्या फेऱ्या वाढवा हो....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

पुणे-लोणावळा लोकलच्या प्रतिदिन 42 फेऱ्या होतात तर, प्रवाशांची दैनंदिन संख्या सुमारे 90 हजार आहे.

पुणे, - ""शिवाजीनगर रेल्वे स्थानकातील ठप्प असलेले पुणे-लोणावळा लोकलसाठीच्या लाइनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच पुणे-लोणावळादरम्यानच्या लोकलच्या फेऱ्या वाढवून प्रवासीभिमुख लोकल सेवा द्यावी'', अशी मागणी प्रवाश्‍यांनी केली आहे. प्रवासी संख्या आणि लोकलच्या फेऱ्या यातील तफावतीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

पुणे-लोणावळा मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या तुलनेत लोकलच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असून त्या वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, या संदर्भात योग्य ती कार्यवाही होत नसल्याची खंत प्रवासी व्यक्त करत आहेत. तसेच दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत एकही लोकल नसल्याने प्रवाशांना तासन्‌तास रेल्वे स्थानकावर थांबावे लागते. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी शिवाजीनगर स्थानकावर लोकलसाठी स्वतंत्र लाइन टाकण्यात येत आहे. मागील अर्थसंकल्पामध्ये यासाठी रेल्वे मंत्रालयाने निधीही दिला आहे. मात्र, हे काम अत्यंत धीम्या गतीने होत असून गेल्या काही दिवसांपासून पावसाचे कारण पुढे करत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे लाइनचे हे काम नियोजित वेळे पूर्ण होऊ शकले नाही.

पुणे-लोणावळा लोकलच्या प्रतिदिन 42 फेऱ्या होतात तर, प्रवाशांची दैनंदिन संख्या सुमारे 90 हजार आहे. प्रवाशांची वाढत्या संख्येमुळे लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी अनेक प्रवासी संघटनांकडून आणि प्रवाशांकडून केली जात आहे. याबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, "" लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे लोकल आणि लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार केली आहे. मात्र, प्रशासनाकडून आश्‍वासनाशिवाय काही मिळत नाही.''
--
कोट
""पुणे रेल्वे स्थानकातून क्षमते पेक्षा जास्त गाड्या चालविल्या जात असल्याने अतिरिक्त लोकल चालवणे सध्या शक्‍य नाही. शिवाजीनगर स्थानकावरील रेल्वे लाइनचे काम पूर्ण झाल्यावर लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येतील.''
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे
--
""लोकलची संख्या कमी असल्याने सकाळी आणि संध्याकाळी गाडीमध्ये प्रवांशीची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
त्यामुळे महिला प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर लोकलच्या फेऱ्या वाढविल्या पाहिजेत.''
चैताली गायकवाड, प्रवासी
--

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: increase local trains