अरे बापरे ! उजनीच्या पाण्याला बघा काय झालंय...

सचिन लोंढे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

कळस : उजनी धरणातील जलप्रदूषणाचे लागलेले ग्रहण सोडविण्याबाबत सरकारी यंत्रणा कुचकामी ठरल्याचे वास्तव समोर येत आहे. सध्या उजनी धरणाच्या पाण्यावर गर्द हिरव्या रंगाचा तवंग आढळून येत असून, हा प्रदूषणाचा तवंग जलचरांसाठी धोक्‍याची घंटा देणारा आहे. पाण्यावरील तवंग दुर्गंधीयुक्त असून, याचा मच्छीमारांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय या पाण्यामुळे अंगाला खाज सुटण्याचे प्रकार घडत असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगत आहेत. 

जलप्रदूषणाने देशी माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर 

कळस (पुणे) : उजनी धरणातील जलप्रदूषणाचे लागलेले ग्रहण सोडविण्याबाबत सरकारी यंत्रणा कुचकामी ठरल्याचे वास्तव समोर येत आहे. सध्या उजनी धरणाच्या पाण्यावर गर्द हिरव्या रंगाचा तवंग आढळून येत असून, हा प्रदूषणाचा तवंग जलचरांसाठी धोक्‍याची घंटा देणारा आहे. पाण्यावरील तवंग दुर्गंधीयुक्त असून, याचा मच्छीमारांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय या पाण्यामुळे अंगाला खाज सुटण्याचे प्रकार घडत असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगत आहेत. 

यंदा उजनी धरण भरल्यामुळे उजनीलगतच्या शेतकऱ्यांबरोबरच धरणात मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. परंतु सध्या त्यांच्यासमोर जलप्रदूषणाची मोठी समस्या उभी ठाकली आहे. भीमा खोऱ्यामध्ये वाढलेले औद्योगीकरण, शहरांतील सांडपाणी विसर्जन या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असून ते थेट उजनीत जमा होत आहे. परिणामी स्थिर झालेल्या या पाण्यावर हा तवंग आढळून येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात होणारे जलप्रदूषण रोखण्यात सरकारी यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप मच्छीमार व धरणग्रस्तांमधून होत आहे. 

उजनीतील पाण्यावर आलेल्या या तवंगाचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत आहे. या हिरव्यागर्द तवंगाची दुर्गंधी येत असून, या पाण्यामुळे अंगाला खाज येत आहे. याशिवाय प्रदूषित पाण्यामुळे देशी माशांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उजनीचे प्रदूषण रोखण्याबाबत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- बळी भोई,  स्थानिक मच्छीमार, पळसदेव (ता. इंदापूर) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase water pollution in ujani dam