लॉकडाउनचे साइड इफेक्ट, मुली- महिला पळून जाण्याच्या प्रकारांत वाढ

डी. के. वळसे पाटील
Tuesday, 4 August 2020

आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात लॉकडाउनच्या काळात जून व जुलै महिन्यात एकूण 9 विवाहिता, सहा तरुणी व दोन अल्पवयीन मुली, अशा एकूण 17 जणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यामुळे

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात लॉकडाउनच्या काळात जून व जुलै महिन्यात एकूण 9 विवाहिता, सहा तरुणी व दोन अल्पवयीन मुली, अशा एकूण 17 जणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यामुळे संबंधितांचे कुटुंबीय व नातेवाईक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर समुपदेशन मोहीम राबविण्याचा निर्णय मंचर पोलिसांनी घेतला आहे.

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य
 
दरम्यान, बेपत्ता झालेल्यांपैकी सहा विवाहिता, चार तरुणी आणि एका अल्पवयीन मुलीचा शोध लागला आहे. एक अल्पवयीन मुलगी, दोन तरुणी व तीन विवाहितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली. लॉकडाउनपासून जवळपास सर्व रस्त्यांवर पोलिसांचे तपासणी नाके आहेत. बेपत्ता झाल्याची कागदोपत्री कुटुंबीयांकडून नोंद करण्यात आली असली, तरी बहुसंख्य तरुणी व विवाहित महिला ओळखीच्या व्यक्तीबरोबरच पळून गेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 

कुटुंबातील संवाद तुटत चालला आहे. लॉकडाउनच्या काळात मोबाईल व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक मुलामुलींचा तसेच विवाहित महिला व पुरुषांचा एकमेकांशी संपर्क वाढला आहेत. या काळात घरामध्ये सतत वास्तव्य वाढल्याने घुसमट होऊन पती व पत्नीमध्ये वादंगांचे प्रमाणही वाढले आहे. अनेक लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. काही तरुणी व विवाहित महिला आमिषांना बळी पडून घर सोडून गेल्याची उदाहरणे आहेत. बेपत्ता झालेल्या तरुणींनी लग्न केल्याच्या घटना घडल्या आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 
 

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर महिला क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत इयत्ता दहावी, बारावीतील विद्यार्थिनी तसेच महिलांचे मेळावे घेऊन समुपदेशन करण्याचे नियोजन केले आहे. याकामी महिला पोलिस पाटीलांचीही मदत घेतली जाईल. 
 - गजानन टोम्पे, 
उपविभागीय पोलिस अधिकारी, खेड विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased rate of girls and women running away from home during lockdown