हडपसर-मांजरी परिसरात डेंग्यूच्या रुग्णात वाढ

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 19 जुलै 2018

मांजरी : नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसह हद्दीलगतच्या गावांमध्येही ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. साथीच्या आजारासह डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मांजरी : नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसह हद्दीलगतच्या गावांमध्येही ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. साथीच्या आजारासह डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गेली काही दिवस होत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठून राहिले आहे. ठिकठिकाणचा कचरा भिजून लिचड तयार झाले आहे. त्यातून मोठ्याप्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. त्यावर मोठ्या संख्येने डास व माशांची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे अनेक लहान मुलांसह इतर नागरिकांनाही थंडी, ताप, खोकला अशा आजाराने घेरले आहे. डेंग्यूची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. अनेक खासगी व सरकारी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. 

मांजरी, फुरसुंगी, साडेसतरानळी, केशवनगर, शेवाळवाडी पालिका हद्दीतील जुन्या कालव्याशेजारील वसाहती आदी ठिकाणी डेंग्यूसदृश्य रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी ग्रामपंचायत व पालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापन, नालेसफाई व औषध फवारणीच्या कामाला प्राधान्य देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

'साडेसतरानळी, केशवनगर भागात डेंग्यूचे रूग्ण वाढत आहेत. पालिकेने औषध फवारणी करण्याची गरज आहे. याशिवाय डेंग्यूची चाचणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.' 
- राहुल तुपे नागरिक, साडेसतरानळी

पावसाळी वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांकडून गावातील विविध भागात औषध फवारणी केली जात आहे. कचरा साठून राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
-शिवराज घुले सरपंच, मांजरी बुद्रुक

आरोग्य केंद्राच्या वतीने कर्मचाऱ्यांकडून आजारी रुग्णांचे सर्वेक्षण केले जात आहे. घरोघर जाऊन आरोग्य जपण्याबाबत प्रबोधन केले जात आहे. खासगी दवाखान्यातून डेंग्यूच्या रुग्णांची माहिती घेतली जात आहे. आरोग्य केंद्राच्या हद्दीतील ग्रामपंचायतींना औषध फवारणीबाबत सूचना दिलेल्या आहेत. - डॉ. डी.जे. जाधव, 
आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र लोणीकाळभोर

Web Title: Increases in dengue patients in Hadapsar-Manjari area