सीझरचे प्रमाण वाढतेय

सीझरचे प्रमाण वाढतेय

पुणे - महिलेची प्रसूती झाली की पहिला प्रश्‍न असतो, ‘सीझर की नॉर्मल?’ बहुतांशी उत्तरे हल्ली सीझर झाल्याचीच असतात. वाट पाहण्याची क्षमता नसणे, कळा सहन न होणे त्यातच सहज उपलब्ध असलेले तंत्रज्ञान यामुळे सीझरचे प्रमाण दिवसागणिक वाढू लागले आहे.  

गरोदर राहण्याचे वय हल्ली वाढले आहे. यामुळे बऱ्याच वेळेस बाळंतणीला गरोदरपणात मधुमेह, रक्तदाब यांसारख्या काही आजारांची बाधा होण्याची शक्‍यता असते. या कारणामुळे अनेक वेळा सीझरचा पर्याय डॉक्‍टरांकडून सुचवला जातो. यामध्ये सातत्याने जंक फूड, फास्ट फूड खाणे, तसेच व्यायामाचा अभाव असणे हेदेखील सीझरचे प्रमुख कारणे ठरू शकतात. खेड्याकडे होणारी ऊठबस ही शहरात तुलनेने कमी असल्याने, तसेच इंडियन टॉयलेटऐवजी कमोडचा वापर करणे अशा काही सवयींमुळे गरोदरपणात त्रास होऊन नॉर्मल प्रसूती होण्याची शक्‍यता कमी होते. 

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते म्हणाले, ‘‘डॉक्‍टर स्वतःच्या फायद्यासाठी कधीच सीझर करीत नाही. पेशंटला वाट पाहण्याची मानसिकता नसणे, सांगितलेला व्यायाम न करणे, तसेच नॉर्मल प्रसूतीमध्ये बाळ दगावण्याची शक्‍यता असते. अशा वेळी डॉक्‍टरांना जबाबदार धरून हिंसाचार करणे आदी कारणांसाठी सीझरचा पर्याय अवलंबला जातो.’’ 

‘‘नैसर्गिक प्रसूती व सीझरच्या खर्चामध्ये हल्ली फारसा फरक  नाही. आम्ही वेळोवेळी रुग्णांशी  चर्चा करून त्याला गर्भाविषयीची माहिती देतो. त्यामुळे पुढे सीझर करावे लागणार की नैसर्गिक प्रसूती होणार, याची कल्पना त्यांना आधीपासूनच येते,’’ असेही त्यांनी सांगितले.

हल्ली महिलांना सर्व काही सहज हवं असतं. बऱ्याचदा नैसर्गिक प्रसूतीची शक्‍यता असते; परंतु केवळ कळा सहन करण्याची मानसिकता नसल्याने सीझर करावे लागते. योग्य वयात गरोदरपणाची संधी न घेतल्यानेही बाधा येण्याची शक्‍यता असते.  
- डॉ. अर्चना चव्हाण, स्त्रीरोगतज्ज्ञ

डॉक्‍टर स्वतःच्या फायद्यासाठी सीझर करीत नाहीत; परंतु सीझर करण्याची अनेक कारणे आहेत. नैसर्गिक प्रसूती करतानाही सीझरची वेळ येऊ शकते. यामुळे गैरसमज 
राहू नयेत. 
- डॉ. पूनम येलनारे, स्त्रीरोगतज्ज्ञ

मुहूर्तही पाहिला जातो
डॉ. संजय गुप्ते म्हणाले, ‘‘सीझर सांगितल्यापैकी ६० ते ७० टक्के महिलांचे नातेवाईक मुहूर्त काढून आणतात. प्रत्येक वेळी अशी प्रसूती शक्‍य नसते. हे बहुतांशी सुशिक्षित नातेवाईक असतात. त्यांना त्यातील अडचणी सांगितल्याने ते मुहूर्ताचा हट्ट सोडण्यासही तयार होतात.’’ डॉ. अर्चना चव्हाण म्हणाल्या, ‘‘असे लोक येतात; पण आम्ही त्यांना असे काही करण्यास स्पष्ट नकार देतो. अडचणीची वेळ असल्यास आम्ही त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेण्याची विनंती करतो.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com