नव उद्योजकांसाठी इनक्‍युबेशन सेंटर

मीनाक्षी गुरव
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

पुणे - विद्यार्थ्यांना एखादं स्टार्टअप सुरू करायचं असेल किंवा त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ हवं असेल, तर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे व्यासपीठ मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना वाव देत नवीन उद्योजक घडविण्यासाठी विद्यापीठात लवकरच ‘इनक्‍युबेशन सेंटर’ उभारण्यात येणार आहे.

पुणे - विद्यार्थ्यांना एखादं स्टार्टअप सुरू करायचं असेल किंवा त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ हवं असेल, तर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे व्यासपीठ मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना वाव देत नवीन उद्योजक घडविण्यासाठी विद्यापीठात लवकरच ‘इनक्‍युबेशन सेंटर’ उभारण्यात येणार आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बायो-टेक्‍नॉलॉजी, ग्रीन टेक्‍नॉलॉजी, इन्व्हायरोमेंट टेक्‍नॉलॉजी, मटेरिअल सायन्स, इंटेलिजन्स सेक्‍शन अशा विविध विषयांतील स्टार्टअप्स आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांना या सेंटरच्या माध्यमातून संधी मिळणार आहे. अर्थात विद्यापीठात यासाठी स्वतंत्र विभागाची रचना करण्यात आली आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीने (एमएसआयएस) पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यासंदर्भात विद्यापीठाला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना विद्यापीठात व्यासपीठ मिळणार आहे.

‘‘इनोव्हेशन सोसायटीमार्फत शैक्षणिक संस्था, उद्योजक, संशोधन संस्था आणि अन्य अशा चार गटांत इनक्‍युबेशन सेंटरच्या उभारण्यासाठी निधी देण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते,’’ अशी माहिती इनक्‍युबेशन इनोव्हेशन अँड इंटरनॅशनल लिंकेजेस्‌च्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली.

विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक सातत्याने नावीन्यपूर्ण संकल्पना मांडत असतात; परंतु त्या संकल्पनांवर काम करून त्यातून स्टार्टअप्स उभारण्यासाठी त्यांना पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही. त्यातून ‘सायन्स अँड इनोव्हेशन पार्क’ची संकल्पना पुढे आली. याद्वारे विद्यार्थ्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. या केंद्रातून नव्याने स्टार्टअप्स सुरू व्हावेत आणि त्यातून दरवर्षी १५ ते २० कंपन्या तयार व्हाव्यात,’’ असे उद्दिष्ट विद्यापीठाने ठेवले आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

संबंधित संस्थांना दरवर्षी एक कोटी रुपये असे सलग पाच वर्षे हा निधी इनोव्हेशन सोसायटीमार्फत दिला जाणार आहे. त्यानुसार राज्यातील जवळपास ५० हून अधिक संस्थांनी सोसायटीकडे अर्ज केले होते. त्यातून २० संस्थांनी सादरीकरण केले. सोसायटीने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने निधीसाठी त्यातील जवळपास १० संस्थांची निवड केली आहे. यात राज्यातील पुणे विद्यापीठासह अन्य काही विद्यापीठांचा समावेश आहे.
- सिजो वर्गिस, व्यवस्थापक, स्टार्टअप अँड इनोव्हेशन, (एमएसआयएस)

Web Title: Incubation Center for New Business