भादलवाडीतील सारंगागार धोक्‍यात (व्हिडिओ)

सचिन लोंढे
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

मातीउपशाला प्रतिबंध न बसल्यास येथील पक्ष्यांचे सारंगागार धोक्‍यात येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. भविष्यात तलावाच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होणार आहे.
- ऍड. महेश कन्हेरकर, स्पंदन पर्यावरण राष्ट्रीय विकास संस्था

पाण्याअभावी तलाव कोरडा; काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा

कळस (पुणे) भादलवाडी (ता. इंदापूर) येथील पक्षांचे सारंगागार असलेल्या ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व धोक्‍यात येणाऱ्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सध्या पाण्याअभावी तलाव कोरडा पडल्याने त्यातील काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा आहे. तलावातील माती, मातीमिश्रित वाळू उपसण्याची परवानगी मिळविण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात अनेकांची धावपळ वाढली आहे.

एकीकडे तलावात पाणी नसल्याने यंदा पक्षी विणीच्या हंगामास हजेरी लावतील का नाही, हा प्रश्न पक्षी अभ्यासकांना आहे, तर दुसरीकडे तलावातील माती, मातीमिश्रित वाळूवर अनेकांचा डोळा असल्याने तलावाचे अस्तित्व धोक्‍यात येण्याची भीती आहे. तलावातील ही माती व मातीमिश्रित वाळू उपसण्याची परवानगी मिळावी, यासाठी अनेकांनी आपले प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे.

याबाबत माहिती देताना स्पंदन पर्यावरण राष्ट्रीय विकास संस्थेचे अध्यक्ष ऍड. महेश कन्हेरकर म्हणाले, "भादलवाडी तलावाचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे आहे. मात्र, सरकारी पातळीवर याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. तलावातील मातीउपसा करण्यात येऊ नये याबाबत येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव केला आहे. याच्या प्रती तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे तहसील कार्यालयाकडून माती उपशास परवानगी दिली जात नाही. मात्र, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मातीउपसा करण्याची लगेच परवानगी देण्यात येते. यातही शेतकऱ्यांना शेतात माती भरण्यासाठी हवी असल्यास त्याला डावलले जाते. मात्र, वीटभट्टीधारकांना लगेच परवानगी देण्यात येते. यामुळे या प्रकाराची चौकशी व्हावी व मातीउपशाच्या परवानग्या देऊ नयेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

- भादलवाडीतील ब्रिटिशकालीन तलाव चित्रबलाक पक्ष्यांचे सारंगागार म्हणून परिचित.
- दरवर्षी येथे डिसेंबरअखेर शेकडो प्रजातींचे लाखो पक्षी विणीच्या हंगामासाठी हजेरी लावतात.
- तलावातील दाट काटेरी झुडपांवर पक्ष्यांचे चार ते पाच महिने वास्तव्य.
- ही झाडी दरवर्षी पाण्याखाली असते, यंदा मात्र ती उघड्यावर आहे.

Web Title: indapur bhadalwadi water tank and bird issue