इंदापुरात खरीप हंगाम धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

कळस - जुलै महिना संपत आला तरी इंदापूर तालुक्‍याच्या बहुतांश भागामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी खरिपातील पेरणीचे प्रमाण घटले आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ १५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

कळस - जुलै महिना संपत आला तरी इंदापूर तालुक्‍याच्या बहुतांश भागामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी खरिपातील पेरणीचे प्रमाण घटले आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ १५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

तालुक्‍यातील भिगवण व काटी भाग वगळता इतरत्र अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पालखीसोबत पाऊस येतोच, असे भाकीत वर्तविणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. यामुळे यंदा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने एकदा-दोनदा हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांच्या पावसाविषयीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु त्यानंतर अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी ऊस लागवडीवर भर दिला आहे. यामुळे उसाच्या क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.

खरिपाचा तालुका म्हणून इंदापूरची ओळख आहे. दरवर्षी सरासरीपेक्षाही अधिक क्षेत्रावर खरिपातील पेरण्या होतात. यंदा मात्र वेळेत समाधानकारक पाऊस न झाल्याने सरासरीच्या केवळ १५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. ७ जून ते ३० जुलै हा खरिपातील पेरणीचा कालावधी आहे. मात्र यापुढेही पाऊस झाला तरी सरासरीएवढ्या क्षेत्रावर यंदा पेरण्या होणे शक्‍य नाही.
- सूर्यभान जाधव, इंदापूर तालुका कृषी अधिकारी

ऊस लागवड क्षेत्रात वाढ
इंदापूर तालुक्‍यात दरवर्षी ११ हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपातील पिकांच्या पेरण्या होत असतात. यामध्ये प्रामुख्याने मका, बाजरी या तृणधान्यांबरोबर तूर, मूग, उडीद यांसारख्या कडधान्यांचाही समावेश असतो. शेतकरी सर्वाधिक पसंती मका पिकाला देत असून, जनावरांच्या चाऱ्याबरोबरच चार पैसे हाताशी लागत असल्याचा त्यांचा आजवरचा अनुभव आहे. या तुलनेत बाजरी पिकाच्या पेरणी क्षेत्रात घट होत असल्याचे आढळून येत आहे. शिवाय फळबाग व ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढल्यानेही खरिपातील पेरण्यांवर याचा परिणाम दिसून येत आहे.

Web Title: Indapur Kharip Season Danger