इंदापुरात टंचाई आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यामुळेच

सचिन लोंढे
सोमवार, 22 जुलै 2019

पुणे ः विधानसभा निवडणूक जशी जवळ येत चालली तसा राजकीय कलगीतुरा रंगत आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे हे दोघेही संधी मिळेल तिथे एकमेकांवर आरपो-प्रत्यारोप करतात. इंदापूरमधील पाणी टंचाईला व शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे ते भरणे यांच्यामुळेच अशी टीका पाटील यांनी केली आहे.

इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथे कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. एकीकडे उजनीचे पात्र दुसरीकडे नीरा डावा व खडकवासला कालवा असूनही इंदापूर तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. तालुक्‍यात 60 टॅंकरने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. जनावरांच्या 12 छावण्या सुरू आहेत. उजनीच्या पाण्यावर नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची पिके जळून गेली. यातून त्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्‍यात सक्षम नेतृत्व नसल्याने नागरिकांना दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याचे पाटील यांनी सांगितले. यामुळे तालुक्‍यात परिवर्तन करण्याची गरज असून 2014 मध्ये केलेली चूक पुन्हा करू नका, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.

लोकप्रतिनिधीचा प्रशासनावर वचक राहिला नाही. उजनीच्या पाण्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने, धरणग्रस्तांचे प्रपंच उद्‌ध्वस्त झाले. गाळमोरीतून पाणी सोडण्याचे अधिकार केवळ मंत्रिमंडळाला असताना, अधिकारी मात्र कोणाच्याही सांगण्यावरून पाणी सोडून देतात. या पाण्यासाठी कायदेशीर लढा उभारण्यासाठी आपण तयार आहोत, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

खडकवासला कालव्याचे पाणी काही दिवसांनी दौंडमधून खाली येणे बंद होईल. तसेच नीरा डावा कालव्याचे पाणीही बारामतीतून खाली येणार नाही. यामुळे येणाऱ्या काळात इंदापूरकरांना कायम दुष्काळाचा सामना करावा लागेल. यासाठी आपण एकत्रित हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारला पाहिजे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur Politics Between Patil & Bharne