भिगवणला हातावरून रंगला सामना

ज्ञानेश्वर रायते
मंगळवार, 24 जुलै 2018

भवानीनगर - भिगवणच्या (ता. इंदापूर) जैन श्रावक संघाच्या कार्यक्रमात गायकाने उपस्थितांना हात वर करायला काय सांगितले, सारा कार्यक्रम एक ‘हाती’ रंगला आणि भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या फटकेबाजीने इंदापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीची रंगत आली.

भवानीनगर - भिगवणच्या (ता. इंदापूर) जैन श्रावक संघाच्या कार्यक्रमात गायकाने उपस्थितांना हात वर करायला काय सांगितले, सारा कार्यक्रम एक ‘हाती’ रंगला आणि भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या फटकेबाजीने इंदापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीची रंगत आली.

जैन श्रावक संघाच्या वतीने चातुर्मास व वास्तू उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भिगवणला भाजपचे खासदार दिलीप गांधी, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रेय भरणे एका व्यासपीठावर होते. त्यामुळे शाब्दिक फटकेबाजी ऐकायला मिळणार, याची उत्सुकता होतीच. फक्त कार्यक्रम धार्मिक असल्याने याला काही अटकाव होईल, असेही वाटत होते. त्यातच मध्यभागी गांधी बसले होते, त्यामुळे दोघांचा गांधींशी संवाद होत होता; मात्र एकमेकांशी कोणीच बोलले नाही.

कार्यक्रमात गायक अनुप जैन यांनी एका गाण्यावेळी उपस्थितांना हात वर करायला सांगितले आणि तेथेच राजकीय फटकेबाजीला सुरवात झाली. 

गायनाच्या कार्यक्रमानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘गायक अनुप जैन यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण त्यांनी ‘हात’ दाखवायला सांगितले. आम्हीही लगेच हात वर केले, आता फक्त या ‘हाता’ची आठवण ठेवा. अर्थात, याला साक्षीदार भाजपचे खासदार दिलीप गांधी आहेत. त्यामुळे अनुप आता आम्ही तुम्हाला आमच्या सर्व कार्यक्रमांना बोलवू. आमचे काम सोपे जाईल. खरेतर हा कार्यक्रम लांबला. मात्र, हात दाखवायला सांगितल्याने आता उशीर झाला तरी चालेल, असेच वाटले. वेळ खूप झाला असला, तरी आम्ही ‘घड्याळा’कडे पाहत नसल्याने वेळ लागला तरी मला त्याचे काही वाटले नाही.’’ 

या वाक्‍यावर टाळ्या पडल्या. कार्यक्रमात दिलीप गांधी यांनी बोली लावून कलश एक लाख एक हजार रुपयांना घेतला, त्याविषयी पाटील म्हणाले, ‘कलश त्यांनी एक लाखाला घेतला, कारण त्याला जीएसटी नाही आणि गांधीसाहेब, जीएसटी लागू नसता ना, तर भिगवणमधील ही धार्मिक इमारत सहा महिन्यांपूर्वीच झाली असती.’’

आमदार भरणे यांनीही ही संधी सोडली नाही. ते म्हणाले, ‘‘अनुपजी तुम्हाला आमच्याकडूनही धन्यवाद! कारण तुम्ही ‘हात’ दाखवायला सांगितल्यानंतर अगोदर आमचे ‘घड्याळ’ चमकले. आपोआपच आमचे काम सोपे झाले.’’

दिलीप गांधी यांना बचावाचा पवित्रा घ्यावा लागला. ‘‘हात दाखविल्यानंतर असा ‘हात’ दाखविला,’’ असे म्हणत त्यांनी कमळाच्या पाकळ्यांसारखी हाताची मुद्रा केली आणि जीएसटी कमी केल्याचे सांगितले. एकंदरीत भाजप खासदारांच्या उपस्थितीत इंदापुरातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा कलगीतुरा सगळ्यांचे मनोरंजन करून गेला..!

Web Title: Indapur state assembly elections tone