esakal | सुप्रिया सुळेंच्या विजयाच्या हॅटट्रीकमध्ये इंदापूर तालुक्याचा सिंहाचा वाटा
sakal

बोलून बातमी शोधा

Indapur taluka plays a major role in Supriya Sules victory for loksabha election
  • इंदापूर विधानसभा मतदार संघात ६४.३९ टक्के मतदान
  • इंदापूर तालुक्यात ७० हजार ८२७ मताधिक्य

सुप्रिया सुळेंच्या विजयाच्या हॅटट्रीकमध्ये इंदापूर तालुक्याचा सिंहाचा वाटा

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

लोकसभा 2019
इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात ठेवलेला जनसंपर्क, मोदी लाटेत सुध्दा विकासाचे मुद्दे जनतेसमोर प्रभावी पद्धतीने मांडण्यात आलेले यश या जोरावर आदर्श संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यात ७० हजार ८२७ मताधिक्य घेवून विजयाची हॅटट्रीक केली. सौ. सुळे यांना १ लाख २३ हजार ४७१ तर कांचन कुल ५२ हजार ६४४ मते पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या पराभवामुळे इंदापूरात कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला नाही मात्र कार्यकर्त्यांनी एकमेकास पेढे भरवत विजय साजरा केला. निवडणूकीत तालुक्यातून उभे राहिलेल्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

बारामती लोकसभा मतदार संघ निवडणूकीत इंदापूर विधानसभा मतदार संघात ६४.३९ टक्के मतदान झाले. मागील निवडणूकीत ६२.०९ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदान जास्त झाल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. मात्र मतदारांनी सुळे यांना विजयी करून बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले. सौ. सुळे यांना मागील निवडणूकीत २३ हजार मताधिक्य होते. मात्र या निवडणूकीत सुळे यांना तिप्पटीहून जास्त विजयी मते मिळाली. या निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिपल्स रिपब्लीकन पक्ष तसेच इतर समविचारी पक्षाच्या महाआघाडीच्या सुळे तर भाजपा, शिवसेना, भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गट तसेच दौंड रासप आमदार राहूल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्यातच मुख्य लढत झाली. सुळे यांनी उमेदवारी घोषित होण्यापुर्वीच २१० गावांचा दौरा पुर्ण केला तर कुल यांची उमेदवारी घोषीत होण्यास उशीर झाला. दोघेही बारामतीकर असल्याने सुरवातीस एकतर्फी वाटणारा हा सामना चांगलाच रंगला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारास भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,जलसंपदा मंत्री राम शिंदे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार राहूल कुल यांनी मतदार संघात सभा घेवून चांगलेच उत्तर दिल्याने निवडणूक रंगली. संजय सोनवणे, प्रदिप गारटकर, आप्पा- साहेब जगदाळे, प्रविण माने, महारूद्र पाटील, अॅड. कृष्णाजी यादव, भरत शहा, करणसिंह घोलप, लाला- साहेब पवार, अंकिता मुकूंद शहा व सहका-यांच्या सुळे यांच्या प्रचारास भाजपाच्या पृथ्वीराज जाचक,बाबासो चवरे, मारूतराव वणवे, तानाजी थोरात, माऊली चवरे, माऊली वाघमोडे, सागर काळे, राजेंद्र काळे, विशाल बोंद्रे, अॅड. नितीन कदम, निलेश देवकर यांनी चोख उत्तर दिल्याने निवडणूक रंगतदार बनली. त्यातच माजी मंत्री पाटील यांची अजित पवार, शरद पवार यांनी मनधरणी केल्यानंतर आमदार भरणे यांच्या समर्थकामध्ये भरणे यांना डावलले असल्याची भावना झाली.

मात्र आमदार भरणे यांनी सर्व कार्यकर्त्यांची सुळे यांच्या प्रचारासाठी एकत्रित मोट बांधली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मधील स्थानिक कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फायदा उठविण्याच्या भाजपा रणनितीचा कुल यांना थोडाच फायदा झाला. कुठलेही काम न करतात्यांना पक्षप्रतिमेवर मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना विधानसभेस पडलेली १ लाख ७ हजार तर काँग्रेसचे माजी मंत्री पाटील यांना पडलेल्या ९५ हजार मतांची बेरीज केली असता सुळे यांना दोन लाख मते पडणे आवश्यक होते. मात्र त्यांना १ लाख २३ हजार ४७१ मतांवर समाधान मानावे लागले.

त्यामुळे नेते व्यासपीठावर एकत्र होते मात्र काही गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी नेत्यांचे ऐकले नाही. त्यामुळे न ऐकणा-या कार्यकर्त्यांचे संशोधन होणे गरजेचे आहे. हर्षवर्धन पाटील यांना आगामी विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शब्द दिला असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे तसे असल्यास भाजपास आयताच आयात केलेला उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. मात्र तो उमेदवार कोण असेल हे फक्त महसुल मंत्री चंद्रकांत पाटील हेच सांगू शकतात.