"ते' खूप लांऽऽब आहेत..! 

"ते' खूप लांऽऽब आहेत..! 

ताम्हिणी घाट..! खोल दऱ्या, घनदाट जंगल, कोसळणारे धबधबे, सुखावणारी हिरवळ.. पुणे-रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्‍यातील हा घाट पर्यटकांचा "हॉट फेव्हरिट' भाग..! पुण्याहून फिरायला जायचं असेल, तर अगदीच लगेच "ऍक्‍सेसिबल' असणारा हा भाग.. पण गेली कित्येक दशकं राहणाऱ्यांपर्यंत मात्र अजूनही पोचू शकलेलो नाही.. आदिवासींमधील सर्वांत मागासलेल्या जमातींपैकी "कातकरी' ही एक जमात! स्वतंत्र भारतामध्ये "भारतीय' असल्याचा पुरावा मिळवितानाच त्यांच्यासमोर अडचणींचे प्रचंड मोठे डोंगर आहेत. 

पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये कातकरी समाज आहे. मुळशी तालुक्‍यात त्यांचे प्रमाण सर्वाधिक! या तालुक्‍यात त्यांचे 56 पाडे-वस्त्या आहेत. जवळपास कुणाकडेही स्वत:चं घर बांधण्यासाठी गुंठाभरही जमीन नाही. ताम्हिणी, निवे, गोठे, भांबुर्डे अशा अनेक गावांजवळच्या कातकरी पाड्यांना भेट दिल्यावर या परिस्थितीची जाणीव होते. दुर्गम भागात छोट्याशा पाड्यांवर दहा ते पंधरा कुटुंबं राहतात. मातीच्या भिंती.. मातीनंच सारवलेल्या आणि वाळलेल्या फांद्यांचं छप्पर टाकून बांधलेल्या लहानशा झोपड्या! मोलमजुरी करून दोन वेळचं जेवण मिळणंही अवघड आहे त्यांना.. सहा महिने पाड्यांवर आणि सहा महिने रोजगारासाठी भटकंती करणारे हे लोक.. 

पावसाळ्यात पाड्यांच्या आसपासच्या भागात भातलागण सुरू असते. दिवसाला दीडशे रुपये मिळतात.. इतरवेळी कुणी काही काम दिलंच, तर दोन पैसे मिळतील, या आशेवर ही माणसं जगतात. कातकरी समाजाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही कामाला नाही म्हणत नाहीत.. पावसाळा संपला किंवा जास्त पाऊस झाला, तर यांच्या हाताला काहीच काम नसतं. त्यांच्यापैकी काहीजण दर सहा महिन्यांनी वीटभट्टी, कोळसा भट्टीवर कामासाठी स्थलांतरित होत असतात. तिथेही संपूर्ण कुटुंबानं केलेल्या कामाची मजुरी दिवसाला 200 किंवा 300 रुपये! अशात कसला आलाय संसार आणि सणवार.. मग वीटभट्टी मालकांकडून उचल घ्यायची आणि ती फिटेपर्यंत गुलामासारखं काम करायचं.. देश 71 वा स्वातंत्र्य दिन धामधुमीत साजरा करत असताना यांचं वास्तव वेगळं आहे.. 

कांदा, चटणी-भाकर हे त्यांचे रोजचे अन्न! हातात चार पैसे आले, तर घरात डाळ शिजणार.. दुसऱ्यांच्या शेताच्या बांधावरून भाज्या आणल्या, तर ताटात भाजी असणार.. रोजंदारीवर कुणी भातलावणीचं काम दिलं, तर पिकलेल्या धान्यात थोडा वाटा मिळतो. त्यामुळे तांदूळ, नाचणी हे धान्य त्यांच्याकडे असते. रेशन कार्डावर मिळणारं थोडंफार धान्य अडल्या-नडल्या वेळी कामी येतं. 

गेल्या 70 वर्षांत कित्येक सरकारे आली-गेली.. पण यांच्यापर्यंत आपण "स्वातंत्र्य' काही पोचवू शकलो नाही.. पुण्यापासून त्यांच्या पाड्यापर्यंतचं अंतर फारतर शंभर-दीडशे किलोमीटर आहे. पण हे अंतर आपण 70 वर्षांत कापू शकलेलो नाही..! 

कातापासून कातवडी हा खाद्यपदार्थ बनवणारे... कथोडे म्हणजेच कातकरी म्हणून ओळखले जातात. हे मूळचे राजस्थानमधील! पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला हा समाज संपूर्ण राज्यात विखुरला गेला. कडेकपाऱ्यांमध्ये, धरणाच्या काठानं, गावाच्या बाहेर कुठेतत्री, मोठ्या शेतकऱ्यांच्या बांधावर.. जिथे जागा मिळेल, तिथे हे स्थायिक झाले. 

आरोग्य.. म्हणजे काय? 

तालुक्‍याच्या गावाला, किमान 40 किलोमीटर अंतर कापल्यावर दवाखान्यापर्यंत पोचता येतं. दिवसभरातून एकदा एसटी येते. ती चुकली, तर दुसरं वाहन नाही. एसटी गेल्यानंतर कुणी आजारी पडलं, तर सहन करण्याशिवाय पर्याय नाही. सरकारी दवाखान्यात सर्दी-खोकल्याच्या पलीकडचे उपाय जरा अवघडच! नीट, वेळेत उपचार न झाल्याने अनेकांचे बळी गेल्याचंही इथले लोक सांगतात. 

"राशनकार्ड भेटलं.. पण पियाला पाणी, घरकूल काय ते तीन पिढ्या झाल्यातरी भेटलं नाही. इथं एक गाव तयार झाला.. तरी आजून माझं नाव सरकाराला कसं गेलं नाय? पाण्याचं नाय.. घरकुलाचं नाय.. जागा-पागासुद्धा आजून मिळाली नाय.. मग का राहून दिलं इथं..?' मनाबाई पवार या आजींच्या प्रश्‍नाचं उत्तर कुणाकडे असेल? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com