Independence Day : आपले पंतप्रधान कोण? माहीत नाही! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

"मावशी.. कुठून चालत आलात?' 
"आसाण्यावरून..!' 
"आता कुठं निघालात?' 
"इथंच.. इंगळूणला..' 
"किती अंतर आहे?' 
"नाय सांगता येनार.. इतकी साळा नाय शिकलो.. पण बाराला निघालो होतो.. आता अडीच वाजले!' 
"डोंगरातून चालत..? कशाला गेला होता मावशी?' 
"गाडीची सोय नाय तर काय करू! धाव्याचा कारेक्रम होता ना..!' 

"मावशी.. कुठून चालत आलात?' 
"आसाण्यावरून..!' 
"आता कुठं निघालात?' 
"इथंच.. इंगळूणला..' 
"किती अंतर आहे?' 
"नाय सांगता येनार.. इतकी साळा नाय शिकलो.. पण बाराला निघालो होतो.. आता अडीच वाजले!' 
"डोंगरातून चालत..? कशाला गेला होता मावशी?' 
"गाडीची सोय नाय तर काय करू! धाव्याचा कारेक्रम होता ना..!' 

जुन्नर तालुक्‍यातील आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या मावशी! वय अंदाजे 60 वर्षं.. सोबत त्यांच्याच वयाच्या आणखी सात-आठ महिला.. पहाटे तीन तास चालून आसणे गावाला पोचल्या. कार्यक्रम उरकून डोंगर-दऱ्यांमधून भर पावसात पुन्हा तीन तास चालून त्या घरी परतत होत्या. ही "त्यांच्या'पर्यंत पोचलेल्या स्वातंत्र्याची छोटीशी झलक! 

शिवनेरी किल्ल्यापासून अवघ्या 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या महादेव कोळी आणि ठाकर जमातींच्या आदिवासी पाड्यांपर्यंत जाण्याचा "मार्ग' अजूनही नीट नाही. निसर्गानं या भागाला भरभरून दिलं; पण तिथपर्यंत पोचायचे पर्याय खूपच कमी! सुविधा नावालाही नसल्या, तरीही संघर्ष करत जगण्याची उर्मी इथे प्रत्येकातच आहे.. 

इथली प्रत्येक वाडी किमान 50-60 उंबऱ्यांची.. उंचीनं कमी असलेली कौलारू घरं.. बाहेर शेळ्या-मेंढ्या किंवा कोंबड्या दिसतात.. त्यातल्या त्यात बरी परिस्थिती असेल, तर घराबाहेर बैलजोडी दिसेल! सध्या भातलावणी जोरात आहे. शेतीमधून मिळणारे एकमेव मोठे पीक म्हणजे तांदूळ! तेही वर्षभर पुरेल इतकंच.. व्यापारासाठीच्या तांदळाचे उत्पादन करण्याएवढी जमीन इथं नाही. भातलावणी संपल्यावर भाताची कापणी होईपर्यंत दुसरं काहीच काम नाही. 

"भाताचं काम संपल्यावर मजुरीला जातो.. पहाटे दोनला उठायचं, स्वयंपाक उरकायचा आणि पाचला गाडीत बसायचं! इथून कुमशेतला जायचं. तिथं लोक येतील. त्यांच्या बांधावर मजुरीला जायचं.. अडीचशे, तीनशे रुपये रोजानं दिवसभर राबायचं.. घरी यायला रात्रीचे नऊ होतात.. ज्यांच्या घरी माणूस आहे, त्यांचा स्वयंपाक होतो; पण माझ्या घरात नाय कोण.. तिथून आल्यावर स्वयंपाक, भांडीबिंडी घासून अकराला झोपायचं..' हातवीज गावच्या अनिता निर्मळ दिनक्रम सांगत होत्या.. 

इथे पाऊस मुसळधार पडतो; पण उन्हाळ्यात कडकडीत दुष्काळ! एक घागर पाण्यासाठी तीन-चार किलोमीटर पायपीट होते. नाही म्हणायला, काही पाड्यांपर्यंत वीज, रस्ते आले आहेत. काही ठिकाणी सिलिंडरही दिसले; तरीही बऱ्यापैकी स्वयंपाक चुलीवरच होतो. कारण, सिलिंडर संपला, तर थेट जुन्नरला यावं लागतं.. थंडी-ताप आला, तरीही प्राथमिक उपचारांसाठी 25-30 किलोमीटरचा किमान प्रवास आहे. दुपारी आणि रात्री एक एसटी आहे. त्याव्यतिरिक्त दळणवळणाची सोय नाही. या वेळा चुकल्यावर एखाद्या दयाळू वाहनचालकानं मदत केली तर ठीक; नाहीतर चालत जा..! दगड-गोट्यांतून, निसरड्या वाटेवरून स्वत:ला सावरत रोज दोन तास चालून मुलांना शाळेत सोडणाऱ्या आणि घेऊन येणाऱ्या महिलाही आहेत इथे.. 

शिक्षक येतील, तेव्हा शाळा भरणारे पाडे आहेत इथे..! अनेक पाड्यांवर महिला शिक्षिका आहेत. घाटातून, डोंगर-दऱ्यांमधून येणं अवघड होतं. शाळेच्या वेळेत एसटी नसल्यानं खासगी गाडी करावी लागते. दिवसाला प्रत्येकी चारशे रुपये भाडे भरावे लागते.. तेही भरून मुलांना शिकवायला येणाऱ्या शिक्षिका आहेत इथे.. 

आयुष्य खडतर असतानाही त्यांनी स्वत:चा मार्ग शोधला आहे.. "तुमचं आयुष्य तुम्हीच जगायला हवं', हेच बहुदा मायबाप सरकारनं त्यांना शिकवलं आहे. 'पंतप्रधान कोण', "राष्ट्रपती कोण' या प्रश्‍नांची उत्तरं यांना ठाऊक नाहीत.. खरंतर.. रोजच्या जगण्यासाठीच झगडावं लागत असताना "पंतप्रधान कोण' यानं काय फरक पडणार आहे त्यांना? 

..अजूनही आशा आहे! 
सोनावळे या छोट्या गावात पहिली ते बारावीपर्यंतची एकात्मिक शासकीय आश्रमशाळा आहे. इथे एकूण 365 विद्यार्थी आहेत; त्यापैकी मुली 236 आहेत. यांना शिक्षणाचं महत्त्व आहे. काहीही करून मुलांना शिकविण्याची धडपड त्यांच्यात दिसते. 

स्त्री-पुरुष समान आहेत..! 
पाड्‌यांवरच्या कामात स्त्री-पुरुष भेदभाव नाही. बाईही पुरुषाच्याच तोडीनं काम करते आणि मोबदलाही समान आहे.. दीडशे-दोनशे रुपये! जनावरांना चरायला घेऊन जाणं, दूध काढणं, पेरणीपासून पिकं काढण्यापर्यंत महिलांचा भक्कम आधार आहे इथल्या पुरुषांना! बारीक अंगकाठी, काटकपणा आणि चुणचुणीतपणा इथे जन्मजातच असावा.. 50-60 वर्षांची बाई इथे सहज डोंगर पार करू शकते.. चप्पल-बुटांशिवाय..!

"ते' खूप लांऽऽब आहेत..! 

Independence Day : आमचं स्वातंत्र्य कुणी चोरलं..?​

Web Title: Independence Day Tribal Issue in Junnar