बोगद्यात कामगारांसाठी स्वतंत्र लिफ्ट (व्हिडिओ)

बोगद्यात कामगारांसाठी स्वतंत्र लिफ्ट
बोगद्यात कामगारांसाठी स्वतंत्र लिफ्ट

वालचंदनगर (पुणे): अकोले (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा नदी जोडप्रकल्पाच्या बोगद्यात गतवर्षी झालेल्या क्रेन दुर्घटनेला आज (ता. 20) एक वर्ष पूर्ण झाले. या अपघातात आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर संबंधित कंपनीने कामगारांच्या सुरक्षा साधनांत वाढ केली असून कामगारांना बोगद्यामध्ये ये-जा करण्यासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्यात आली आहे.

नीरा व भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम इंदापूर तालुक्‍यात 2009 पासून सुरू आहे. काही वर्षे हे काम बंद होते. त्यानंतर दीड वर्षापूर्वी हे काम वेगाने सुरू करण्यात आले होते. मात्र गतवर्षी 20 नोव्हेंबर रोजी अकोले येथे पाच क्रमांकाच्या टप्प्यात कामगार काम संपवून वर येत असताना अचानक क्रेनमध्ये बिघाड झाला. बकेटमध्ये उभे असलेले आठ कर्मचारी सुमारे 210 फूट खोल बोगद्यात कोसळले. या दुर्घटनेत आठही कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर सोमा-मोहिते इंटरप्रायजेस या कंपनीने कामगारांच्या सुरक्षेच्या साधनांमध्ये वाढ केली आहे.

सोनगाव-तावशी-सपकळवाडी-सणसर-काझड-शिंदेवाडी-अकोले-भादलवाडी या गावांमधून हा बोगदा जाणार आहे. बोगद्याचे कामे जमिनीपासून सुमारे 70 ते 90 मीटर खाली सुरू असून याची रुंदी 8 मीटर, उंची 8.25 मीटर व 24 किलोमीटर लांबी होणार आहे. सध्या शिंदेवाडी, अकोले-1, अकोले-2 व भादलवाडी येथे चार ठिकाणी काम सुरू असून सुमारे 4 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 20 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण होण्यासाठी पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. या बोगद्यामध्ये सुमारे 300 कामगार रात्रंदिवस काम करीत आहेत.

कुशल कामगार आणि पुरेशा ऑक्‍सिजन
गतवर्षी कामगारांना बोगद्यामध्ये ये-जा करण्यासाठी बकेटचा वापर केला जात होता. मात्र अपघातानंतर कंपनीने ये-जा करण्यासाठी स्वतंत्र लिफ्ट बसवलेली आहे. ही लिफ्ट वायर रोपऐवजी गिअरवर चालते, त्यामुळे अपघाताचा धोका नसल्याचे सोमा-मोहिते इंटरप्रायजेस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बोगद्यात काम करताना कामगारांना पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजन (प्राणवायू) मिळावा, यासाठी मोठे ब्लोअर बसविण्यात आले आहे. हेल्मेट, शूज, सेफ्टी जॅकेट घातल्याशिवाय बोगद्यात कामगारांना प्रवेश दिला जात नाही. कुशल कामगारांचीच यासाठी निवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक युनिटवर स्वतंत्र सेफ्टी व्यवस्थापकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com