महापालिकेसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

अतिक्रमणविरोधी कारवायांसाठी मिळणार बळ; ५० कर्मचारी असण्याची शक्यता

पुणे - अतिक्रमणविरोधी कारवायांसाठी महापालिकेला पुरेसे पोलिस बळ उपलब्ध होणार आहे. त्याकरिता महापालिकेच्या स्तरावर स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत त्यासाठीची कार्यवाही पूर्ण होईल. त्यातून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे चार पोलिस अधिकारी आणि ५० पोलिस कर्मचारी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील वर्दळीच्या भागातील ४५ रस्ते आणि १५३ चौकांमध्ये हातगाडी, पथारी व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना बंदी आहे. त्याकडे दुर्लक्ष करत रस्ते आणि चौकांमध्ये सर्रासपणे अतिक्रमण करण्यात येते. तसेच महापालिकेच्या मोकळ्या जागांवर गेल्या काही वर्षांपासून दुकाने, हॉटेल आणि घरे थाटली आहेत. अतिक्रमणविरोधी कारवाईला त्या त्या ठिकाणच्या नागरिकांचा विरोध होत असून, त्यामुळे कारवाईत अडथळे आणले जातात. एवढेच नव्हे तर कारवाईसाठी आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संवेदनशील भागात कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते; मात्र पुरेसे पोलिस उपलब्ध होत नसल्याने कारवाई थांबविण्याची वेळ महापालिका प्रशासनावर येते.

येरवड्यात पालिकेच्या एका जागेतील कारवाईदरम्यान महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. याआधीही अशा घटना घडल्याने स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला होता. त्याला तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, येत्या सहा महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.  

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकरिता पोलिस बळ उपलब्ध व्हावे, यासाठी पोलिस ठाणे तातडीने सुरू करण्याच्या हालचाली करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अर्थसंकल्पात (२०१७-१८) नमूद केले आहे.

Web Title: independent police station for pune municpal