‘इंडेक्‍स टू’ आता होणार डिजिटल

‘इंडेक्‍स टू’ आता होणार डिजिटल

पुणे -  प्रॉपर्टीच्या (मिळकत) दस्तनोंदणी गोषवाऱ्याच्या भाग दोनची (इंडेक्‍स टू) प्रमाणित प्रत आता इतिहासजमा होणार आहे. यापुढे नागरिकांना त्यांच्या मिळकतींच्या गोषवाऱ्याची प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी घेतला आहे. यापुढे डिजिटल सातबाऱ्याच्या धरतीवर आता डिजिटल सही असलेला हा गोषवारा घरबसल्या एका क्‍लिकवर मिळणार आहे. यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. आगामी आर्थिक वर्षापासून ही सोय उपलब्ध होणार आहे. 

या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रमही वाचणार आहेत. यामुळे केवळ इंडेक्‍स टूसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात खेटे मारणे बंद होणार आहे. शिवाय त्यासाठी वीस रुपयांच्या स्टॅंपसह करावा लागणारा अर्ज आणि प्रमाणित प्रतीसाठी आकारले जाणारे शुल्कही वाचणार आहे. शिवाय डिजिटल गोषवाऱ्यामुळे प्रमाणित प्रतिची (सर्टिफाईड कॉपी) गरजही भासणार नाही. त्यामुळे नागरिकांना राज्यात कोठूनही आपापल्या मिळकतीच्या मालकी हक्काबाबतचा गोषवारा सहज मिळू शकणार आहे.  

राज्यात दरवर्षी सुमारे २२ ते २५ लाख दस्तांची नोंदणी होत असते. यामध्ये शेतजमीन, बंगला, घर, बैठे घर, सदनिका, दुकान, गाळे आदी विविध प्रकारच्या दस्तांचा समावेश असतो. मालकीहक्काचा दावा करणारी सर्वच कागदपत्रे जवळ बाळगण्याची आवश्‍यकता नसते. या सर्व कागदपत्रांमधील महत्त्वपूर्ण माहितीचा गोषवारा ‘इंडेक्‍स टू’ म्हणजेच मिळकतींचा गोषवारा भाग दोनमध्ये संक्षिप्त स्वरूपात मांडलेला असतो. त्यामुळे मिळकतींवर मालकीहक्क सांगण्यासाठी केवळ हा एकमेव कागद पुरेसा असतो. 

डिजिटल सही ठरणार पुरेशी
मिळकतीच्या ऑनलाइन गोषवाऱ्यावर डिजिटल सही असणार आहे. ही डिजिटल सही असलेला ‘इंडेक्‍स टू’ हा प्रमाणित मानला जाणार आहे. शिवाय मिळकतीची सर्व कागदपत्रे जवळ बाळगण्याचीही गरज भासणार नसल्याचे राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com