भारत-चीन साखर व्यापार सुरू होण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

चीनचा सकारात्मक प्रतिसाद - नाईकनवरे 
अखिल भारतीय साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले की, चीनला गेलेल्या शिष्टमंडळात मी होतो. भारताची साखर उत्तम दर्जाची आहे, अन्य देशांच्या तुलनेत त्यांचा वाहतूक खर्चही कमी होणार आहे, अशा गोष्टी पटवून दिल्या होत्या. चीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावर्षी त्यांना पन्नास लाख टन साखरेची गरज आहे. ते कच्ची साखर आयात करतात. व्यापार मंत्रालयाच्या मार्फत फिक्कीच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. त्यात किमान काही करार होण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्याक्षणी करार झाले नाही तरी त्यादृष्टीने प्रथमच मोठी पावले पडत आहेत.

सोमेश्‍वरनगर - चीनचे शिष्टमंडळ दहा ऑक्‍टोबरला भारतात येणार आहे. दिल्ली येथे मंत्रालयात त्यांच्या बैठकाही होणार आहेत. यानिमित्ताने भारत-चीन यांचा ऐतिहासिक साखर व्यापार सुरू होण्याची शक्‍यता आहे. यामुळे भारताच्या सततच्या अतिरिक्त साखरेच्या संकटावर कायमचा उतारा मिळू शकेल, अशी चिन्हे आहेत. 

भारतात पाच वर्ष सलग अतिरिक्त साखर संकटामुळे उसाची एफआरपी (रास्त व उचित दर) देताना कारखाने मेटाकुटीला येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २०१८-१९ या हंगामात व आता २०१९-२० या हंगामातही साखर निर्यातीचा निर्णय घेतला. मात्र, जागतिक मंदीत भारताला चांगला आयातदार देशही मिळाला नव्हता. दरम्यान, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली चीनमध्ये कारखाने व सरकारी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ गेले होते. त्या वेळी चीन सरकारसोबत समाधानकारक चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर चीननेही सकारात्मक प्रतिसाद देत दहा जणांचे शिष्टमंडळ दिल्लीमध्ये दहा ऑक्‍टोबरला पाठवीत आहे. सरकार, कारखाने, निर्यातदार अशांच्या प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा होणार आहे. 

भारताला निर्यातीची संधी 
चीन दरवर्षी पंचवीस-तीस लाख टन साखर आयात करतो. यावर्षी त्यांचे देशांतर्गत उत्पादन कमी झाल्याने गरज आणखी वाढली आहे. दहा तारखेच्या बैठकीतून या मोठ्या बाजारपेठेकडे भारताची पावले पडण्यास ऐतिहासिक सुरवात होणार आहे. थायलंड आणि ब्राझील देशांमध्येही नेमके साखर उत्पादन घटले असल्याने भारताला नामी संधी चालून आली आहे. भारताने आधीच साठ लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India China may start sugar trade