भारत-चीनचे लष्कर दहशतवादाविरोधात एकत्र 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

पुणे - दहशतवादाला विरोध करण्यासाठी भारतीय लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी एकत्र आल्याचा संदेश बुधवारी संपूर्ण जगाला मिळाला. दक्षिण आशियातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यासाठी हे दोन बलाढ्य विकसनशील देश लष्कराच्या संयुक्त सरावासाठी एकत्र आल्याचा विश्‍वास दोन्ही लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

पुणे - दहशतवादाला विरोध करण्यासाठी भारतीय लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी एकत्र आल्याचा संदेश बुधवारी संपूर्ण जगाला मिळाला. दक्षिण आशियातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यासाठी हे दोन बलाढ्य विकसनशील देश लष्कराच्या संयुक्त सरावासाठी एकत्र आल्याचा विश्‍वास दोन्ही लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यातील "हॅंड इन हॅंड' या सहाव्या संयुक्त सरावाला आजपासून पुण्यात सुरवात झाली. हा संयुक्त लष्करी सराव सुरू झाल्याचे पीपल्स लिबरेशन आर्मीचे मेजर जनरल वांग हायजिआंग यांनी सांगितले. भारतीय लष्कराचे मेजर जनरल योगेशकुमार जोशी या वेळी उपस्थित होते. निमशहरी भागात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात संयुक्त नियोजन करणे आणि त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा या संयुक्त लष्करी सरावाचा मुख्य उद्देश असल्याचे दोन्ही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

याबाबत जोशी म्हणाले, ""दहशतवादी कारवाया जगभरात वाढल्या आहेत. भारत आणि चीन या देशांनाही त्याची झळ बसली आहे. या दोन्ही देशांचे बलाढ्य लष्कर एकत्र येऊन दहशतवादाशी लढा देत असल्याचा संदेश या संयुक्त सरावातून जगाला मिळेल. या सरावादरम्यान एकमेकांची शस्त्रे जवानांना हाताळता येणार आहेत. दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर स्फोटकांची हाताळणी, शोधमोहीम यांचा सराव यात करण्यात येणार आहे. यात दोन व्यूहरचनात्मक सराव करण्यात येतील. तसेच, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना मदतीचा हात देण्याबाबतही प्रात्यक्षिक होणार आहे.'' 
 

हायजिआंग म्हणाले, ""ही दोन्ही विकसनशील शक्तिशाली राष्ट्रे आहेत. या देशांच्या विविध भागांत दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. त्याचा थेट परिणाम देशांतर्गत सुरक्षितता आणि स्थैर्यावर होत आहे. भविष्यात या विरोधात लढण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे.'' 
 

या सरावाबद्दल माहिती देताना ब्रिगेडिअर अलोक चंद्रा म्हणाले, ""दहशतवादाच्या विरोधातील लढाईत भारतीय आणि चीनी सैनिक खांद्याला खांदा लावून लढतील. या संयुक्त सरावात दोन्ही देशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.'' 
 

पीपल्स लिबरेशन आर्मीचे वरिष्ठ कर्नल झांग जिया लिन म्हणाले, ""या सरावाच्या निमित्ताने भारत आणि चीनमधील सैनिक एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत.'' 
 

भारताची कलारीपटू आणि चीनच्या मार्शल आर्टची प्रात्यक्षिके 
भारतीय पारंपरिक युद्धकौशल्य असलेल्या कलारीपटूचे भारतीय लष्करातर्फे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यात दांडपट्टा, भाला, ढाल-तलवार, काठी यांच्या साहाय्याने शत्रूला नेस्तनाबूत करण्यात आले. त्यानंतर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी दाखविलेल्या मार्शल आर्टलाही उपस्थितांनी दाद दिली. 
या वेळी दोन्ही देशांच्या राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली. 

Web Title: India-China military terrorism together