भारत गॅसच्या सिलिंडरचा तुटवडा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पुणे - भारत गॅस कंपनीकडून गेल्या आठ दिवसांपासून पुरवठा कमी झाल्याने शहरात सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे बुकिंग केल्यानंतर आठ- आठ दिवस सिलिंडर न मिळाल्याने ग्राहकांची मोठी अडचण निर्माण होत आहे. या संदर्भात विचारणा केली असता, लवकरच पुरवठा सुरळीत होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. 

पुणे शहरात भारत गॅस कंपनीचे सर्वाधिक ग्राहक आहेत. गेल्या आठ दिवसांपासून कंपनीकडून पुणे शहराला आवश्‍यक तेवढा गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नाही. दररोज येणाऱ्या सिलिंडरच्या गाड्या दोन ते तीन दिवसांतून एकदा येतात, त्यामुळे बुकिंग केल्यानंतर 24 तासांनंतरही सिलिंडर मिळत नाही, त्यातून बुकिंगचा बॅकलॉग वाढत चालला आहे. उपलब्ध होणाऱ्या सिलिंडरमधून बुकिंगच्या तारखेनुसार वाटप केले जात आहे. त्यामुळे अनेकांनी बुकिंग करूनही पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना कंपनीच्या डीलरकडे चकरा माराव्या लागत आहेत. त्यातच सिलिंडरवाटप करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनही यामध्ये हेराफेरी केली जात असल्याने नागरिकांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. 

या संदर्भात चौकशी केल्यानंतर कंपनीच्या उरण आणि शिक्रापूर येथील प्लॅन्टमध्येच गॅसचा पुरवठा होत नाही, त्यामुळे गरजेइतका सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याची माहिती समोर आली. त्यातून हा सगळा गोंधळ निर्माण झाला आहे. आणखी आठ दिवस ही अडचण राहील, असे एका डीलरकडून सांगण्यात आले. अन्य कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा मात्र सुरळीत आहे. या संदर्भात कंपनीचे पुणे टेरिटरी मॅनेजर पवनकुमार यांच्याशी संपर्क साधला असता, 

ते म्हणाले, ""गॅसपुरवठ्यामुळे अडचण निर्माण झाली आहे; परंतु येत्या दोन दिवसांत ही अडचण दूर होईल आणि सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होईल.'' 

Web Title: India gas cylinders shortage