अन्नधान्य उत्पादनात भारत आघाडीवर- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

 

 

माळेगाव : "गेल्या काही दशकांमध्ये भारताने अन्नधान्य उत्पादनात अग्रक्रम पटकाविल्याची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील व भारत या देशांच्या अन्नधान्य उत्पादनाकडे जगाचे लक्ष असते. भारत हा काही प्रमुख पिकांच्या बाबतीत प्रथम किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात दुग्धोत्पादन, गहू, भात, काही डाळवर्गीय पिके, काही तेलबिया, केळी, आंबा यासारखी फळपिकांचा समावेश होतो. देशाला हे स्थान मिळवून देण्यात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा मोलाचा वाटा आहे,'' असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.

माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेने केलेल्या संशोधन कार्याचा वार्षिक आढावा घेण्यासाठी शरद पवार आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
पवार म्हणाले, ""वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी भारतीय शेतीला आणखी भक्कम करण्यात संशोधकांचे मोलाचे सहकार्य देशाला लाभले आहे. बदलत्या हवामानातील विविध घटकांचा पिकांवर होणारा प्रतिकूल परिणामामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. विशेषतः राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कमी खर्चात व कमी पाण्यात अधिक उत्पादन घेता यावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या पिकांचे संरक्षण होण्यासाठी खऱ्या अर्थाने ही संस्थेतील शास्त्रज्ञ करीत असलेले संशोधन शेतकऱ्यांना फायद्याचे ठरत असून, त्याचे आम्हाला समाधान मिळत आहे.''
ते म्हणाले, ""हवामानातील विविध घटकांचा पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम व त्याबाबतच्या उपाययोजनांविषयी संस्थेच्या प्रक्षेत्रावर सुरू असलेल्या संशोधन कार्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. नरेंद्र प्रताप सिंह यांनी उपस्थितांपुढे मांडली. पवार यांनी संस्थेने उभारलेल्या वातानुकूलित प्लांट फिनॉमिक्‍स, अद्ययावत वेधशाळा, प्रक्षेत्रावर सुरू असलेले संशोधन कार्य व सर्व फळबागा, तसेच प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळेला भेट दिली. या प्रसंगी डॉ. जगदीश राणे, डॉ. के. के. कृष्णनी, डॉ. एस. के. बल, डॉ. एन. पी. कुराडे, डॉ. अंकुश कांबळे उपस्थित होते.''

भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली) अंतर्गत बारामतीत स्थापन झालेली राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था व झारखंडमधील संशोधन संस्थेच्या प्रगतीमध्ये खूपच तफावत दिसून येते. बारामतीच्या संस्थेने कमी कालावधीत उभारलेल्या वातानुकूलित प्लांट फिनॉमिक्‍स, अद्ययावत हवामान वेधशाळा, प्रक्षेत्रावर सुरू असलेले संशोधन कार्य, तसेच प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा, नीरा अतिथीगृहाची आकर्षक उभारणी संस्थेच्या वैभवात भर घालणारी ठरत असल्याचे गौरोद्वागार शरद पवार यांनी काढले.

Web Title: india highest food producer, tells sharad pawar