भारत, इस्राईलला पुढे जाण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

कुशल मनुष्यबळ आणि संशोधन व विकास क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करणारा देश म्हणून इस्राईलची ओळख आहे. जगातील अव्वल १०० विद्यापीठांत या देशातील तीन विद्यापीठांचा समावेश आहे. तेथे सर्वाधिक स्टार्ट अप कंपन्याही आहेत. भारतातही अलीकडच्या काळात स्टार्ट अपसारख्या माध्यमातून नवउद्योजकांना संधी निर्माण होत आहेत. अशा वेळी उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात भारत आणि इस्राईलमधील विद्यापीठांना परस्परांशी जोडणाऱ्या दुव्याचे काम एसआयएलसी करणार आहे. शिवाय, त्यातून भारतीय युवकांसाठी शिक्षणासह स्टार्ट अपसारख्या विविध क्षेत्रांत कौशल्य विकासाच्या अनेक संधीही उपलब्ध होणार आहेत.
- अभिजित पवार, संस्थापक अध्यक्ष, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन व व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह

इस्राईलचे कॉन्स्युल जनरल अकोव्ह यांचे मत; ‘एसआयएलसी’तर्फे गोलमेज परिषद
पुणे - ‘भारत हा एक अत्यंत सक्षम देश असून शिक्षण, संशोधन, उद्योजकता यांसह विविध क्षेत्रांत भारताने स्वतःची उंची सिद्ध केली आहे. भारतासोबत शैक्षणिक तसेच इतरही पातळीवर संबंध निर्माण होणे, हे आम्ही महत्त्वाचे मानतो. येत्या काळात भारत व इस्राईल या उभय देशांना परस्परांच्या सहकार्याने पुढे जाण्याच्या संधी आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग तसेच सामाजिकशास्त्रांच्या अभ्यासाच्या क्षेत्रात आम्हाला भारताच्या सोबतीने काम करण्यास नक्कीच आवडेल,’’ अशी ग्वाही इस्राईलचे कॉन्स्युल जनरल डेव्हिड अकोव्ह यांनी दिली.

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने इस्राईलमधील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत ‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’मध्ये (एसआयएलसी) मंगळवारी एक गोलमेज परिषद घेण्यात आली. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी अकोव्ह बोलत होते. या परिषदेत महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थाही सहभागी झाल्या होत्या. इस्राईलमधील कौन्सिल फॉर हायर एज्युकेशनच्या नेतृत्वाखाली या प्रतिनिधींनी ही भेट दिली. या वेळी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, एसआयएलसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते.

अकोव्ह म्हणाले, ‘‘एसआयएलसीने आयोजिलेल्या अशा उपक्रमांतून उभय देशांतील संबंध वृद्धिंगतच होणार आहेत. अधिकाधिक भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आमच्याकडील विद्यापीठे इच्छुक आहेत.’’

पालकर म्हणाल्या, ‘‘इस्राईल या देशाने स्वतःच्या बळावर अनेक अडचणींवर मात करत वेगाने प्रगती केली आहे. जगभरातील लोक त्या देशाकडे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणून पाहतात. या देशाकडून अनेक क्षेत्रांविषयी खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या परिषदेतून शैक्षणिक क्षेत्रांतील नव्या संधी खुल्या करण्याचा प्रयत्न आहे.’’

भारत आणि इस्राईलमधील शिक्षणसंस्थांतील सुमारे साठ प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले. गेल्या सप्टेंबरमध्ये सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने इस्राईलमध्ये झालेल्या ‘एज्युकॉन’ या शैक्षणिक परिषदेमध्ये आखण्यात आलेल्या नियोजनानुसार पुण्यातील परिषद घेण्यात आली. या वेळी महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय पातळीवरील उच्च शिक्षणाबाबत उभय देशांतील प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा घडून आली. त्या आधारावर विविध प्रकारचे शैक्षणिक करारही दोन्ही देशांत केले जाणार आहेत.

महाराष्ट्रातील सहभागी शिक्षण संस्था -

 • सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट
 • कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
 • संगमनेर नगरपालिका आर्टस, डी. जे. मालपाणी कॉमर्स ॲण्ड बी. एन. सारडा सायन्स कॉलेज, संगमनेर
 • राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी
 • एमआयटी औरंगाबाद
 • सिंबायोसिस
 • पिंपरी चिंचवड ट्रस्ट
 • अजिंक्‍य डी. वाय. पाटील
 • के. के. वाघ कॉलेज
 • मिटसॉम कॉलेज
 • एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी

या विषयांवर झाली चर्चा -

 • स्टुडंट एक्‍स्चेंज
 • आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप
 • प्रमाणपत्र अभ्यासक्रम
 • ऐच्छिक विषयांतील पदवी अभ्यासक्रम
 • विज्ञान, सामाजिक शास्त्रे, अभियांत्रिकी, पत्रकारिता आदी विषयांतील नव्या संधी

गोलमेज परिषदेतील सहभागी इस्राईलचे तज्ज्ञ -

 • योव्ह तौबमन (काउन्सिल फॉर हायर एज्युकेशन ऑफ इस्राईल, सीनियर को-ऑर्डिनेटर, बजेटिंग ऑफ युनिव्हर्सिटीज ॲण्ड रिसर्च फंड्‌स) 
 • डाना मेटास-ॲपलरोट (आशिया विभाग व्यवस्थापक, तेल अविव विद्यापीठ) 
 • डॉ. डॅनियल गुरवीच (डायरेक्‍टर, ग्लोबल अफेअर्स, एशिया डिव्हिजन, बार इलान विद्यापीठ आणि व्हाइस प्रेसिडेंड फॉर रिचर्स ऑफिस 
 • शोशी झेल्का, (हेड ऑफ द युनिट ऑफ रिसर्च ॲण्ड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, रिसर्च ॲथॉरिटी, हैफा विद्यापीठ) 
 • तोमर उदी, (रिक्रूटमेंट ॲण्ड ॲडमिशन ग्रॅज्युएट प्रोग्रॅम्स, हैफा विद्यापीठ) 
 • प्रा. मॅली शेकोरी (व्हाइस रेक्‍टर, एरियल विद्यापीठ) 
 • डॅनियल हार्डन (डायरेक्‍टर, ऑफ रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी, एरियल विद्यापीठ) 
 • डॉ. एरिक झिमरमन (डायरेक्‍टर ऑफ रिसर्च ॲण्ड ग्लोबल एंगेजमेंट, आयडीसी हर्जलिया) 
 • प्रा. मोशे कोहेन-एलिया (प्रेसिडेंट, कॉलेज ऑफ लॉ ॲण्ड बिझनेस) 
 • रोयी दुआनी (असिस्टंट प्रेसिडेंट फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स ॲण्ड रिसोर्स डेव्हलपमेंट, कॉलेज ऑफ लॉ ॲण्ड बिझनेस) 
 • प्रा. दोव विर (प्रेसिडेंट, वेस्टर्न गॅलिली कॉलेज) 
 • डॉ. स्नेट तमिर (लॅबोरेटरी ऑफ ह्युमन हेल्थ ॲण्ड न्यूट्रिशन सायन्सेस, तेल हाय कॉलेज, एमआयजीएएल- गॅलिली रिसर्च इन्स्टिट्यूट) 
Web Title: India, Israel ties to bring success