देशाला सांस्कृतिक लोकशाहीची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस

shripal_sabnis
shripal_sabnis

पिंपरी - "साहित्याच्या माध्यमातून माणसाला जोडण्याचे काम होते. त्यातही संवेदना मांडणारा वेगळा प्रकार म्हणजे कविता होय. कवितेला कोणताही धर्म नसतो. कवितेचा धर्म एकच मानवता. सध्या राजकीय लोकशाही विस्कटलेल्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत भारतीय एकात्म संस्कृतीसाठी सांस्कृतिक लोकशाहीची गरज आहे'', असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी केले. शब्दधन काव्यमंचतर्फे आकुर्डी येथील बीना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध काव्य पुरस्कारांचे डॉ. सबनीस यांच्या हस्ते वितरण झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. 

अध्यक्षस्थानी बीना इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष इकबाल खान होते. कथाकार राज अहेरराव, काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक, कवयित्री शोभा जोशी, मधुश्री ओव्हाळ, प्रकाश घोरपडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सुरवातीला भगवद्‌गीता आणि कुराण या ग्रंथांना एकत्रित पुष्पहार घातला. 

ज्येष्ठ साहित्यिक माधव राजगुरू (राज्यस्तरीय शब्दप्रतिभा), कवी कैलास भैरट (कवी अरविंद भुजबळ स्मृती), गझलकार दिनेश भोसले, कवयित्री माधुरी विधाटे व मानसी चिटणीस (छावा काव्य), सय्यद आसिफ (इकबाल पुरस्कार), ऍड. अंतरा देशपांडे (काव्यरसिकता) आदी विविध पुरस्कारांचे वितरण झाले. व्हॉट्‌स अप काव्यस्पर्धा विजेते ओव्हाळ, समृद्धी सुर्वे, वर्षा बालगोपाल, आय. के. शेख, चिटणीस यांचाही सन्मान केला. 

सबनीस म्हणाले, ""कार्यक्रमात भगवद्‌गीता आणि कुराण अशा दोन धर्मांच्या प्रतीक असलेल्या ग्रंथांचे केलेले एकत्रित पूजन खूप महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन भाषा, दोन संस्कृतीचा प्रवाह एकत्रित करण्याचा प्रयत्न झाला. धार्मिक आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्मितीसाठी असे कार्यक्रम व्हायला हवे.'' 

राजगुरू म्हणाले, "शब्दप्रतिभा पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. व्यक्तिगत स्वरूपातील पुरस्कार मी स्वीकारत नाही. पुरस्काराचे कार्यक्रम हे स्तुती सोहळे, आयोजकांचे मिरविण्याचे ठिकाण होते. मात्र, हा कार्यक्रम त्याला अपवाद आहे.'' 

""साहित्य क्षेत्राशी जोडलेल्या लोकांवर खूप मोठी जबाबदारी असते. समाजाला योग्य मार्ग दाखविण्याचे काम साहित्यिकाला करावे लागते'', असे मत खान यांनी व्यक्त केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. उमेश सणस यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com