"डिजिटल फुटप्रिन्ट'च्या सुरक्षिततेसाठी आता हवा स्वतंत्र कायदा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

निश्‍चलनीकरणानंतरच्या आणि कॅशलेसला पाठबळ देण्याच्या काळात जो मोठ्या प्रमाणावर माहितीसाठा (डिजिटल डेटा) निर्माण केला जात आहे, त्याच्या सुरक्षिततेसाठी आता स्वतंत्र कायद्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या या "डिजिटल फुटप्रिन्ट्‌स'चा कुठल्याही प्रकारे गैरवापर होऊ नये, यासाठी हे पाऊल तातडीने उचलले जायला हवे,'' असे स्पष्ट मत आधार कार्ड व्यवस्थेचे प्रणेते नंदन नीलेकणी यांनी व्यक्त केले. 

पुणे-  'आधार कार्ड-मोबाईल-बॅंक' या सांधणीतून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळतानाच भ्रष्टाचाराला सुद्धा आळा बसणार आहे, हे खरेच. मात्र, निश्‍चलनीकरणानंतरच्या आणि कॅशलेसला पाठबळ देण्याच्या काळात जो मोठ्या प्रमाणावर माहितीसाठा (डिजिटल डेटा) निर्माण केला जात आहे, त्याच्या सुरक्षिततेसाठी आता स्वतंत्र कायद्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या या "डिजिटल फुटप्रिन्ट्‌स'चा कुठल्याही प्रकारे गैरवापर होऊ नये, यासाठी हे पाऊल तातडीने उचलले जायला हवे,'' असे स्पष्ट मत आधार कार्ड व्यवस्थेचे प्रणेते नंदन नीलेकणी यांनी व्यक्त केले. 

नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेल्या टाय, पुणे संस्थेने नीलेकणी यांचे व्याख्यान शनिवारी आयोजिले होते. "तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारत विकासाची मोठी झेप घेऊ शकेल काय ?' या विषयावर ते बोलले. या वेळी, नागरिकांच्या खासगी माहितीची सुरक्षा आणि अनेकदा राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्‍यक ठरणारी खासगी माहितीवरील देखरेख यांच्यातील झगड्यावरही एक निश्‍चित धोरण आखले जाणे आवश्‍यक असल्याचे मतही त्यांनी नोंदविले. 

नीलेकणी म्हणाले, "" आज भारतात अनेक मूलभूत सुविधाही नाहीत अशी परिस्थिती असताना आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र अनेक विकसित देशांच्या बरोबरीने उभे आहोत, असे एक गमतीशीर वास्तव पाहायला मिळते. त्यामुळे अनेकदा आपल्याकडे सामाजिक प्रश्‍नांचा कैवार घेणाऱ्यांकडून "आधी मोबाईल हवा की, शौचालय हवे ?' अशा पद्धतीचे प्रश्‍न उपस्थित केले जातात. हे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत, यात तीळमात्र शंका नाही. मात्र, याचे उत्तर खरंतर तंत्रज्ञानाच्या प्रगतीतच दडले आहे. हीच वेळ आहे की, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण केलेल्या प्रगतीचा वापर आपल्याकडील इतर मूलभूत समस्या सोडविण्यासाठी करून घ्यायला हवा.'' 
स्वयंचलीत यंत्र आणि तंत्रज्ञानाचा (ऑटोमेशन) रोजगारावर परिणाम होणार नसून, उलट या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याकडील आरोग्य, रोजगार, शेती या क्षेत्रांच्या प्रगतीसाठीच होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

ज्येष्ठांसाठी बुबुळांच्या प्रतिमा अधिक उपयुक्त 

आधार जोडणीत बोटांचे ठसे न जुळल्यामुळे कित्येक ज्येष्ठ नागरिकांचे आधार कार्ड नाकारले गेल्याची वस्तुस्थिती लक्षात आणून देत "सकाळ'च्या प्रतिनिधीने यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना नीलेकणी म्हणाले, "" वाढत्या वयासोबत ज्येष्ठांच्या बोटांचे ठसे अस्पष्ट होत जातात. त्यामुळे बायोमेट्रिक स्कॅनिंगला अडचणी येतात, हे खरे आहे. यावर उपाय म्हणून बोटांच्या ठशांऐवजी ज्येष्ठ नागरिकांच्या बुबुळांच्या प्रतिमांचा आधार खाते जोडणीसाठी बॅंकांकडून विचार केला जायला हवा.'' 
 

क्‍लाऊड तंत्रज्ञान, 5-जी ठरतील महत्त्वाचे 

विविध प्रकारचा महत्त्वाचा आणि मोठ्या स्वरूपाचा माहितीसाठा एकत्रितपणे साठवून ठेवण्यासाठी पूर्वी कंपन्या डेटासेंटरचा उपयोग करत. आता मात्र "क्‍लाऊड' तंत्रज्ञान उपयोगात आणण्यास सुरवात झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, "क्‍लाऊड' तंत्रज्ञानात आता सुरक्षितता सुद्धा खूप वाढली आहे. तंत्रज्ञानाच्या या टप्प्यावर भारतासाठी क्‍लाऊड तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरेल. हे सोयीचे आणि स्वस्त पर्याय म्हणून विचारात घ्यायला हवे. शिवाय, लवकरच आपण "5-जी' तंत्रज्ञानात प्रवेश करणार आहोत. इंटरनेट आणि व्हॉईस कॉलिंगचा वापर वेगवान अन विनाव्यत्यय व्हावा यासाठी 5-जी उपयोगी असणार आहे, असेही नीलेकणी म्हणाले. 
 

Web Title: India needs a security and privacy law