जन्माने पुणेकर असलेला पत्रकार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निरुत्तर करून त्यांची भंबेरी उडवितो तेव्हा...

सुमित बागुल
Saturday, 15 August 2020

...त्याचं झालं असं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच व्हाईट हाऊसमध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं.

पुणे : स्पष्टवक्तेपणा, अचूकता आणि बाणेदरपणा यांचं जवळचं नातं असलेल्या पुणेकरांच्या लौकीकात भर पडली आहे ती, अमेरिकेतील पण जन्मानं पुणेकर असलेल्या शिरीष दाते या पत्रकारामुळे. भर पत्रकार परिषदेत त्यांनी असा प्रश्न विचारला की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निरुत्तर झाले अन त्यांची भंबेरी उडाली. या घटनेचे पडसाद जगभरातील सोशल मीडियावर उमटले असून बहुतेक जणांनी दातेंना हिरो केलं आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरात व्हाईट हाऊसमध्ये 13 ऑगस्ट रोजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोनाविषयक पत्रकार परिषद होती. कव्हरेज करण्यासाठी शिरीष म्हणजेच एस. व्ही. दाते तेथे उपस्थित होते. संधी मिळाल्यावर दाते यांनी प्रश्न विचारला की, 'अमेरिकन लोकांना ज्या सगळ्या खोट्या गोष्टी सांगितल्यात त्या बद्दल आज साडेतीन वर्षांनी तुम्हाला खेद वाटतो का,' हा प्रश्न ऐकल्यावर ट्रम्प यांच्या चेहऱ्यावरील नूर पलटला. 'कोणी' (WHO), असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. त्यावर दाते पुन्हा म्हणाले, 'मिस्टर प्रेसिडेंट तुम्ही... सगळ्या खोट्या गोष्टी, अप्रामाणिकपणा तुम्ही जो केला....' काही क्षण गांगरलेल्या ट्रम्प यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याकडे दुर्लक्ष केलं आणि दुसऱ्या रिपोर्टरला प्रश्न विचारण्यास सांगितलं.

ट्रम्प यांनी दाते यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळलं, पण सर्वाधिक चर्चा त्यावरच सुरू झाली. ट्रम्प हे प्रसारमाध्यमांबद्दल कायमच भडक विधानं करतात. परंतु, पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर त्यांना देता आलं नाही, याचे लाईव्ह प्रक्षेपण जगभर झालं. 

ट्रम्प यांची भंबेरी उडविल्याच्या प्रकरणावर हफपोस्टने दाते यांचा एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. त्यात दाते यांनी म्हटले आहे की, सुमारे साडेतीन वर्षांपासून ट्रम्प यांना मला हा प्रश्न विचारायचा होता. कारण व्हाईट हाऊस असो अथवा राष्ट्राध्यक्ष ते लोकांसाठी काम करतात. त्यामुळे त्यांना आपण विचारणा करू शकतो. परंतु, काही पत्रकार असा प्रश्न विचारू शकत नाही. कारण त्यांना त्या नेत्यांपर्यंत पोचायचं असतं. असा प्रश्न कसा येऊ शकतो, याबद्दल ट्रम्प यांना आश्चर्य वाटू शकते. पण, लोकशाहीत अशी विचारणा करणे योग्यच आहे. 

 

शिरीष व्ही. दाते हे मूळचे पुण्याचे. 1964 मध्ये त्यांचा जन्म पुण्यात झाला. त्यानंतर 1967 मध्ये त्यांचे आई वडील अमेरिकेत स्थायिक झाले. दाते हे सध्या हफ पोस्टमध्ये पत्रकार आहेत. व्हाईट हाऊस कॉरसपॉन्डट म्हणून तेथे त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा वावर कायम असतो. गेल्या 30 वर्षांपासून दाते हे पत्रकार आहेत. या पूर्वी त्यांनी असोसिएटेड प्रेस, पाल्मबीच पोस्ट, नॅशनल जर्नल, एनपीआरसाठीही काम केलं आहे. दाते हे नुसते पत्रकार नाहीत तर, लेखकही आहेत. सहा पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. 

ट्रम्प यांचे रिपब्लिकन पक्षातील सहकारी आणि 2016 च्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीचे स्पर्धक जेब बुश यांच्यावर त्यांनी 'जेब-अमेरिकाज नेक्स्ट बुश' हे लिहिेलेले पुस्तक लोकप्रिय झाले आहे. फ्लोरिडातील सिनेटर बॉब ग्रॅहम यांच्या 'क्वाईट पॅशन' या आत्मचरित्राचे लेखनही दाते यांनी 2004 मध्ये केलं आहे. त्याशिवाय ब्लॅक सनशाईन (2002), स्मोकआऊट (2000), फायनल ऑर्बिट (1997), स्पीडवीक (1999) आणि डीप वॉटर (2001) या पुस्तकांचे लेखनही दाते यांनी केलं आहे.

शिरीष दाते यांचा पुण्यातील जन्म आहे. शिरीष दाते हे गेली तीन दशकं अमेरिकेत पत्रकारिता करतात. हफ पोस्ट (Huff post) नामक एका माध्यमाचे ते व्हाईट हाऊस मधील करस्पॉन्डन्ट म्हणून काम करतात. दाते यांनी ट्रम्प यांना थेट प्रश्न विचारल्यानंतर दाते यांच्या निर्भीड पत्रकारितेचं आता अनेकांकडून कौतुक होतंय. दाते हे मूळचे पुण्याचे असल्याची माहिती एका मराठी वृत्तपत्राने दिली आहे.  

indian american journalist of direct question to US president donald trump  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian american journalist of direct question to US president donald trump