सूर्याची रेडिओ प्रतिमा घेण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

- सूर्याची सर्वाधिक स्पष्ट आणि सखोल रेडिओ प्रतिमा घेण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश 
- अंतरिक्षामधील वातावरणाचा अंदाज वर्तविणे होणार शक्‍य 

पुणे : सूर्याची सर्वाधिक स्पष्ट आणि सखोल रेडिओ प्रतिमा घेण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. अंतरिक्षातील वातावरणाचा अंदाज नोंदविण्यासाठी सूर्याची ही प्रतिमा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रातील (एनसीआरए) शास्त्रज्ञ अतुल मोहन, सुरजित मंडल, रोहित शर्मा यांच्यासह डॉ. दिव्या ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या संघाने ऑस्ट्रेलियातील "मर्चिसन वाइडफिल्ड ऍरे' (एमडब्ल्यूए) या रेडिओ दुर्बिणीद्वारे माहिती संकलित करून सूर्यप्रकाशाची सर्वांत सखोल प्रतिमा आहे. हे शास्त्रज्ञ गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सहकार्याने मिळणाऱ्या माहितीचा वापर करून सूर्याच्या गूढ गोष्टींची उकल करण्यासाठी साधने आणि तंत्र तयार करीत होते. त्यांनी "ऑटोमेटेड इमेजिंग रूटीन फॉर कॉम्पॅक्‍ट ऍरेंज फॉर द रेडिओ सन' (एअरकर्स) असे सॉफ्टवेअर पॅकेज विकसित केले.
Sun
याविषयी मंडल म्हणाले, "यापूर्वी झालेल्या सूर्याच्या अभ्यासात हिमवर्षावाच्या टिपांसारख्या केवळ अतिचमकदार ज्वाला दिसत होत्या. अंतरिक्ष हवामान समजून घेण्यासाठी आवश्‍यक असलेल्या अनेक गोष्टी सूर्याच्या अभ्यासातून समोर येतात.'' या शोधामुळे सौर वातावरणात खोलवर चालणारी नवीन घटना दर्शविण्यात आल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकन ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या "ऍस्ट्रोफिजिकल जर्नल'च्या एप्रिलमधील अंकात यासंदर्भातील अभ्यास प्रकाशित होणार आहे. 

अंतरिक्षामधील वातावरणाचा अंदाज वर्तविणे होणार शक्‍य 
पृ
थ्वीतलावरील हवामानाचा अंदाज असतो तसाच अंतरिक्षातीलही वातावरणाचा अंदाज वर्तविला जातो. सूर्यमालिकेतील पोकळीत असणाऱ्या वातावरणाचा अंदाज हा अनेक बाबींसाठी महत्त्वाचा असतो. संवादासाठीचे उपग्रह, जीपीएस नेव्हिगेशन, यातील अनेक घडामोडींवर अंतरिक्षातील वातावरणाचा परिणाम होत असतो. मात्र, आता सूर्याची सखोल प्रतिमा मिळाल्याने अंतरिक्षातील अंदाज अधिक चांगल्याप्रकारे वर्तविणे शक्‍य होणार आहे. 
- डॉ. जे. के. सोळंकी, वरिष्ठ अधिकारी, एनसीआरए 

असा होणार उपयोग : 
- सूर्याच्या निर्मितीमागील रहस्य उलगडण्यास होणार मदत 
- सूर्यामुळे निर्माण होणाऱ्या घटकाची मिळेल माहिती 
- सूर्याच्या वातावरणाचा होणार उलगडा 

सूर्याच्या अभ्यासाची देशातील काही ठिकाणे : 
- उटी रेडिओ दुर्बीण 
- कर्नाटकातील गौरी बिदनूर रेडिओ दुर्बीण 
- उत्तर प्रदेशातील दृश्‍य स्वरूपाची दुर्बीण (ऑप्टिकल टेलिस्कोप) 
- उदयपूर दृश्‍य स्वरूपाची दुर्बीण 
- तमिळनाडूतील वेणूबापू दुर्बीण 

Web Title: Indian scientists succeed in taking sun radio images