डॉक्‍टरांचेही प्राण वाचविणारा स्वदेशी 'देवदूत' 

Aones-Lab
Aones-Lab

देशातील पहिल्या विषारी वायू शोषणाऱ्या "एवन्स सेरीज 6' उपकरणाची पुण्यात निर्मिती 
पुणे - शस्त्रक्रियेदरम्यान मानवी शरीरातून अनेक प्रकारचे विषाणू वायू बाहेर पडतात. या वायूंच्या दुष्परिणामांपासून डॉक्‍टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बचाव करणारे पहिले स्वदेशी उपकरण पुण्यातील अभियंता अतुल काळुसकर यांनी विकसित केले आहे. विषारी वायुला शोषून घेणारे "एवन्स सेरीज 6'नावाच्या या उपकरणाला राष्ट्रीय चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळेची (एन.ए.बी.एल.) मान्यताही मिळाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लेसर किंवा इलेक्‍ट्रोसर्जिकल शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या जैविक आणि रासायनिक विषारी वायूंना शोषून घेण्यासाठी सध्या परदेशी व महागड्या उपकरणांचा वापर केला जातो. त्याला पर्याय म्हणून हे पहिलेच स्वदेशी उपकरण पुण्यातील "एवन्स लॅब्ज' या स्टार्टअप कंपनीने बनविले आहे. या उपकरणाचा फायदा शल्यविशारदांबरोबरच भूलतज्ज्ञ आणि शस्त्रक्रियेत सहभागी डॉक्‍टरांच्या संपूर्ण टीमला होईल. दर महिन्याला 75 उपकरणे बनविण्याची लॅबची क्षमता असून आवश्‍यकतेनुसार त्याचे प्रमाण वाढवता येईल, असे काळुसकर यांनी नमूद केले आहे.

एवन्स सेरीजची आवश्‍यकता - 
- सध्या आपल्या देशात अमेरिका, जर्मनी, जपान येथील कंपन्यांचे उपकरण मागवले जाते. त्यामुळे या उपकरणाचा खर्चही खूप आहे. त्या तुलनेत या भारतीय बनावटीच्या उपकरणाची किंमत निम्मी असून त्याचा देखभाल खर्चही निम्मा आहे. 
- लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांमध्ये हे उपकरण "ट्रोकार' शी जोडले जाते आणि ओपन सर्जरीमध्ये ते "कॉटरी'ला जोडले जाते. यामध्ये वायू विविध फिल्टर आणि रेडिएशन चेंबरमधून जाऊन निर्जंतुक होतो. 
- संपूर्णतः भारतीय बनावटीचे असल्यामुळे येथील वैद्यकीय उद्योगक्षेत्राला चालना मिळेल. 

एवन्स सेरीजची वैशिष्ट्ये -
- फॉर्माल्डीहाईड, बेंझीन, टोल्यूरीन यांच्या वायुंपासून, तसेच एचआयव्ही, हॅपिटॅटीस यांसारखे जिवाणू शस्त्रक्रियेदरम्यान बाहेर पडतात 
- अशा घातकवायुंना चार टप्प्यांमध्ये शुद्ध केले जाते 
- शोषण्यात आलेला वायू प्रथम तीन चाळण्यांमधून गाळल्यानंतर अल्ट्राव्हायोलेट किरणांत त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. 
- संपूर्ण निर्जंतुकीकरण झाल्यानंतर तो वायू वातावरणात सोडण्यात येतो. 

अनेक शल्यविशारदांचे काम मी जवळून बघितले आहे शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या वायूंनी त्यांना धोका होण्याची शक्‍यता असते. या उपकरणाची आवश्‍यकता लक्षात घेण्याबरोबरच डॉक्‍टरांची गरज, खर्च, उपकरणाचा उपयोग या सगळ्याचा वर्षभर अभ्यास करून आम्ही उपकरण बनविले आहे. 
- अतुल काळुसकर, निर्माते 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com