इंद्रायणी तांदळाने खाल्ला सोशल मीडियावर "भाव'

इंद्रायणी तांदळाने खाल्ला सोशल मीडियावर "भाव'

कोळवण (पुणे)  : यंदा उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. त्यातील मावळ-मुळशीचे प्रमुख खरीप पीक असलेल्या भात पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे येथील भातपिकाची प्रमुख जात असलेला सुवासिक इंद्रायणी तांदूळ 70 रुपये किलोने विका, असा संदेश सध्या व्हॉट्‌सऍपद्वारे व्हायरल होत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी महागाईची बी, खते खरेदी केली. सुरवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे मावळ-मुळशीतील शेतकऱ्यांनी पंपाच्या साह्याने पाणी देत कशीबशी पिके जगविली. नंतर पाऊस सुरू झाल्यावर पिके चांगली बहरली होती. शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. भातलावणीच्या कामाला मजुरांच्या कमतरता शेतकऱ्यांना जाणवत होती. त्यात यंत्राचे दरही वाढलेलेच होते. नंतर पावसाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याने लावलेली पिके वाहून गेली. उर्वरित काही पिकांनाही रोगाचा तडाखा बसला. नंतर लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे हाल केले. भातपिके तयार झाली होती; पण पावसाने ती काढता येत नव्हती. अनेक शेतकऱ्यांनी खटाटोप करीत पिके काढली. अनेक संकटांना तोंड देत, कष्ट करीत पिके काढली; परंतु उत्पादनावर याचा परिणाम होऊन उत्पादन खूपच कमी झाले. त्यात सरकारने घोषित केलेली हेक्‍टरी 8000 रुपये मदत जाहीर केली. त्यापेक्षा जास्त खर्च बी-बियाणांना, खतांना गेल्याने ही रक्कमही तुटपंजी असल्याचे शेतकरी म्हणत आहेत.

चवीला गोड, आंबेमोहोरप्रमाणेच सुगंधित, खाण्यास मऊ अशी वैशिष्ट्ये असलेल्या या इंद्रायणी तांदळाचे बाजारातील स्थान हळूहळू उंचावत आहे. गेल्या सात ते आठ वर्षांत या तांदळाची मागणी केवळ पुणे शहरातूनच नव्हे तर नगर, सातारा, कोल्हापूर, नवी मुंबई येथूनही आहे. मुळशीमध्ये जवळपास 85 टक्के इंद्रायणीचे उत्पादन होते. उर्वरीत उत्पन्न आंबेमोहोर, बासमती व इतर जातींचे होते. अनेक ग्राहकांकडून इंद्रायणी तांदळाची मागणीत वाढ होत आहे.

ओल्या दुष्काळामुळे हातातला घास हिरावून घेतला. कुटुंबांना घर चालविणेही अवघड झाले आहे. त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्याची गरज असल्याने इंद्रायणी तांदूळ 70 रुपये किलोपेक्षा कमी किमतीला विकू नका, असे आवाहन सध्या व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com