इंद्रायणी स्वच्छतेचा तरुणाईने घेतला ध्यास

बबनराव भसे
बुधवार, 11 एप्रिल 2018

इंदोरी - मावळ तालुक्‍यातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा पडल्याने तिचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. काठावरील गावांचे सांडपाणी, कंपन्यांचे रासायनिक पाणी इंद्रायणीच्या थेट पात्रात सोडले जात असल्याने ग्रामीण भागातही इंद्रायणीचे पाणी दूषित झाले आहे. जलपर्णी कुजल्याने जलचर प्राण्यांचे जीवन धोक्‍यात आले असून, दुर्गंधीमुळे हे पाणी जनावरेही पीत नाहीत. या प्रश्‍नी इंदोरीतील काही युवकांनी जलपर्णीमुक्त इंद्रायणी करण्याचा ध्यास घेतला आहे.

वडिवळे धरणामुळे बाराही महिने इंद्रायणी तुडुंब असते. कुडमळा, शेलारवाडी, किन्हई व सांगुर्डीतील बंधाऱ्यांमुळे नाणोली, वराळे, माळवाडी, इंदोरी, कोटेश्वरवाडी, शेलारवाडी, कान्हेवाडी, किन्हई, बोडकेवाडी, सांगुर्डी या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी फायदा होता; मात्र दूषित पाणी सोडल्याने तसेच वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. 

इंदोरीतील बालाजी ग्रुप, मुक्ताई मित्रमंडळ व भक्ती शक्ती मंडळाच्या सर्व सदस्यांनी इंद्रायणी स्वच्छतेचा निर्धार केला. जनजागृतीसाठी पत्रके वाटप, मोक्‍याच्या ठिकाणी फलक लेखन, व्हाट्‌सॲप या माध्यमातून अभियानात सहभागी होण्याचे व मदतीचे आवाहन केले. जलपर्णी काढण्यासाठी जेसीबी, पडाव, मोठ्या वाहनाच्या ट्यूब, दोर, दाताळ या साहित्याच्या साह्याने जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले. दररोज सुमारे पाच ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात येत आहे. त्याला सुमारे दहा हजारांपर्यंत खर्च होतो. आर्थिक मदतीच्या आवाहनासही यश आले. रवींद्र भेगडे, सुनंदा राऊत, विठ्ठल शिंदे, अंकुश ढोरे, दिलीप ढोरे, अविनाश शिंदे, राजेंद्र काशीद, नरेशकुमार मिश्रा, पंढरीनाथ शेवकर, संजय राऊत, भाऊसाहेब अवसरे यांनी आर्थिक मदत केली. आतापर्यंत सुमारे दोनशेहून अधिक ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली आहे. दररोजच्या श्रमदानामुळे युवकांची संख्या रोडावली. त्यामुळे आता दर रविवारी जलपर्णी काढण्याचे काम युवकांनी सुरू ठेवले आहे. इतर दिवशी लोकसहभागातून मजुरांकडून काम करून घेतले जात आहे. इंदोरी गावचे रहिवासी असलेले पोलिस उपायुक्त (ठाणे) शांताराम ऊर्फ भाऊसाहेब अवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी हे सेवाभावी कार्य सुरू केले.

सर्वच गावांनी  अभियान राबवावे
इंदोरीसह कामशेत, टाकवे, आंबी, कातवी, वारंगवाडी, नाणोली, वराळे, माळवाडी कोटेश्वरवाडी या गावांनी ही जलपर्णीमुक्ती अभियान राबवणे गरजेचे आहे. जलपर्णी वाहत येऊन इंदोरी कुंडमळा बंधारा असल्याने परिसरात येऊन थडकते. तसेच इंद्रायणी पात्रात थेट दूषित पाणी सोडले जात आहे. त्याचे सरकारने सर्वेक्षण करून संबंधितांना आदेश द्यावेत, अशी ही मागणी या युवकांनी केली आहे.

Web Title: Indrayani river cleanliness