आळंदी ते तुळापूरदरम्यान इंद्रायणी दूषित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

भाविकांच्या अंघोळीचा प्रश्‍न 
आळंदीत जोग महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून भाविक येतात. मात्र दूषित पाणी आणि जलपर्णीमुळे भाविकांनी अंघोळ करावयाची कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने वडिवळे अथवा जाधववाडी धरणातून आळंदीला पाणी सोडावे, अशी मागणी वारकरी संस्थेचे विश्‍वस्त भालचंद्र नलावडे आणि बाजीराव चंदिले गुरुजी यांनी केली आहे.

आळंदी - पिंपरी महापालिका हद्दीतून सोडलेल्या सांडपाण्यामुळे आळंदी ते तुळापूर या सुमारे अकरा किलोमीटरच्या मार्गावरील इंद्रायणी नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे. तसेच या ठिकाणी पात्रात जलपर्णीचा वेढा पडला आहे. दोन्ही पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांच्या तीर्थस्नानाची जलपर्णी आणि दूषित पाण्याने गैरसोय होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, सध्या इंद्रायणीचे पात्र पिंपरी महापालिकेतून येणाऱ्या सांडपाण्यामुळे काळवंडले आहे. महापालिका हद्दीतून चिखली, कुदळवाडी तसेच चिंबळी, केळगाव, आळंदी पालिकेचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात कोणतेही प्रक्रिया न करता सोडले जात 
आहे. 

परिणामी परिसरातील विहिरींचे पाणीही प्रदूषित झाले आहे. तसेच धानोरे, निरगुडी, गोलेगाव, मरकळ, तुळापूर या भागात नदीपात्रात जलपर्णी बेसुमार वाढली आहे. परिणामी परिसरात शेतीलाही प्रदूषित पाणी दिले जात असल्याने भाजीपाल्यांवर तसेच इतर पिकांवर प्रदूषित पाण्याचा दूरगामी परिणाम होत आहे. आळंदी व तुळापूरला विशेष महत्त्व आहे. मात्र या दोन तिर्थक्षेत्रांमधून वाहणाऱ्या इंद्रायणीची सध्या दुरवस्था झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indrayani river uncleaned from Alandi to Tulapur