देहूतील इंद्रायणीची पातळी खालावली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

देहूरोड - देहूतील इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असून, वैकुंठ गमनस्थान मंदिर आणि मुख्य मंदिरामागील घाट पूर्णतः उघडे पडले आहेत. बीज सोहळा आठ दिवसांवर आल्याने नदीला पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.

देहूरोड - देहूतील इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असून, वैकुंठ गमनस्थान मंदिर आणि मुख्य मंदिरामागील घाट पूर्णतः उघडे पडले आहेत. बीज सोहळा आठ दिवसांवर आल्याने नदीला पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.

बीज सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत असतो. या निमित्ताने राज्याच्या विविध भागांतून भाविक काही दिवस अगोदरच येथील विविध धर्मशाळांमध्ये मुक्कामी येतात. त्यांची सकाळी अंघोळीसाठी नदीवर वर्दळ असते. मात्र पाणी कमी झाल्याने दोन्ही घाट उघडे पडले आहेत. नदीत पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाकडे केल्याचे सरपंच सुनीता टिळेकर, उपसरपंच दिनेश बोडके यांनी सांगितले.

वडिवळे धरणातून पाणी सोडले
खास बीजेच्या निमित्ताने मावळातील वडिवळे धरणातून १२५ ते १५० क्‍युसेक पाणी सोडले असून बिजेपर्यंत ते देहूत पोचेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुनील गव्हाणे यांनी ‘सकाळ’ला दिली. चिंबळीकरांनीही पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

बिजेपूर्वी रस्ता दुरुस्तीचे आश्‍वासन
खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या तळवडे सीमेवरील जकात नाका ते देहूतील संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार या दोन किलोमीटर रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून तुकाराम बिजेपूर्वी बुजविण्यात येतील, असे आश्‍वासन पिंपरी-चिंचवड महापालिकेने देहू ग्रामस्थांना दिले आहे. पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे, माजी सरपंच कांतिलाल काळोखे आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे व सहशहर अभियंता राजन पाटील यांची भेट घेऊन विठ्ठलवाडी रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. सदर रस्ता महापालिकेकडे वर्ग आहे; मात्र सामूहिक आंदोलन होऊनही रुंदीकरण रखडलेले आहे. रस्ता पूर्णतः उखडल्याने पादचारी, वाहनचालक यांची गैरसोय होत असल्याची माहिती देण्यात आली. यावर रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून त्वरित बुजविले जातील; मात्र रुंदीकरणासाठी भूसंपादन गरजेचे आहे. त्यानंतरच महापालिका रुंदीकरण करेल. त्यामुळे भूसंपादनासाठी प्रशासनाची बैठक बोलावण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली.

Web Title: Indrayani river water level down