औद्योगिक वसाहतींना ‘बूस्ट’

औद्योगिक वसाहतींना ‘बूस्ट’

जेजुरी, शिरवळसह बारामती, दौंडच्या वसाहतींना निर्यातीची संधी

पुणे - नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्‍यातील जागा निश्‍चित झाल्यामुळे जेजुरी, शिरवळसह बारामती आणि दौंड तालुक्‍यातील औद्योगिक वसाहतींना चालना मिळणार आहे. रोजगारनिर्मिती आणि निर्यात वाढण्यासाठीही याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत काहीशा दुर्लक्षित असणाऱ्या या वसाहतींना ‘बूस्ट’ मिळेल, असा विश्‍वास उद्योगजगतातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पुरंदर तालुक्‍यातील पारगाव, वाघापूर, राजेवाडी या भागातील जागा राज्य सरकारकडून विमानतळासाठी निश्‍चित केली आहे. यापूर्वी खेड तालुक्‍यातील जागा निश्‍चित केली होती. पुरंदरमधील जागेमुळे या भागातील चारही औद्योगिक वसाहतींतील उद्योगांना चालना मिळू शकते, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे-सातारा रस्त्यावरील शिरवळ औद्योगिक वसाहतीला लोणंदमार्गे हे विमानतळ जवळ पडणार आहे. या वसाहतीमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. ज्यांचा कच्चामाल बाहेरून येतो; तसेच पक्‍क्‍या मालाची निर्यात होते. त्यात काही औषधनिर्माण कंपन्या असून, त्यांनाही याचा लाभ होणार आहे. पुरंदर तालुका बारामतीजवळ असल्याने तेथील उद्योगांनाही या विमानतळामुळे गती मिळेल. येथील उद्योगांना सध्या मुंबईहून माल आणावा लागतो, तसेच इतर ठिकाणी माल पाठविण्यासाठी मुंबई विमानतळ हाच पर्याय आहे. सोलापूरमार्गे दौंड औद्योगिक वसाहतींना हे विमानतळ जवळ राहणार आहे, तसेच जेजुरी वसाहतीत मोठे उद्योग येण्यास मदत होणार आहे. गेल्या दोन वर्षांत या वसाहतींमध्ये काही मोठे उद्योग आले असून, विमानतळाची घोषणा झाल्यानंतर विविध उद्योगांकडून विचारणा सुरू झाली आहे.

पीएमआरडीएच्या प्रस्तावित रिंगरोडमुळे पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतींना आणि रांजणगाव, सुपे येथील उद्योगांनाही यामुळे संजीवनी मिळणार आहे. विमानतळाला हा रस्ता सलग्न राहणार असल्याने या वसाहतींनाही विमानतळापर्यंत पोचणे शक्‍य होईल. खेड-शिवापूरच्या परिसरात गेल्या पाच वर्षांत मोठे प्रकल्प सुरू झाले आहेत, त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी विमानतळ उपयुक्त ठरणार आहे.

चाकण आणि तळेगाव येथील उद्योगांसाठी या विमानतळाचे अंतर जादा असले तरी ‘लिंक’ रस्ता विकसित झाल्यानंतर त्यांनाही याचा फायदा होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. सरकारने नियोजित विमानतळासाठी निवडलेली जागा योग्य असल्याचा दावा उद्योजकांकडून केला जात आहे. नगर आणि सातारा रस्त्यांच्या मधील भागाचा गेली काही वर्षे रखडलेला विकास यामुळे मार्गी लागणार आहे. तेथे नवे उद्योग उभारण्यास संधी असल्याचे एका उद्योजकाने सांगितले.

प्रस्तावित विमानतळामुळे पाचही जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींना फायदा होणार आहे. सध्या या वसाहतींना परदेशात निर्यात करण्यासाठी किंवा कच्चा माल आणण्यासाठी मर्यादा येत आहेत. विमानतळामुळे ही सोय उपलब्ध होऊन व्यवसाय काहीपटींमध्ये वाढेल. अनेक उद्योगांनी त्या दृष्टीने विचार करण्यास सुरवात केली आहे.
- सतीश मगर, माजी अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com