Ice-and-Dog
Ice-and-Dog

औद्योगिक बर्फ बनला खाण्याचा!

पुणे - तुमच्या उसाच्या रसात टाकलेला किंवा तुम्हाला आवडणाऱ्या फळांच्या ज्यूसमध्ये वापरलेला बर्फ बहुतांशवेळा खाण्यायोग्य असेल, अशी खात्री देता येत नव्हती. ‘हा बर्फ औद्योगिक कारणांसाठी उत्पादित केला आहे. खाण्यासाठी नाही,’ असा भला मोठा फलक लावून बर्फ उत्पादक आपले हात वर करत होते.

मात्र, औद्योगिक बर्फात खाद्य निळा रंग टाकण्याच्या आदेशानंतर, ‘हा बर्फ खाण्यासाठी नाही’ असा दावा करणाऱ्या याच कारखान्यांमधून रातोरात खाद्य बर्फ तयार होऊ लागल्याचा चमत्कार शहर आणि परिसरात घडत आहे. 

औद्योगिक आणि खाद्य बर्फ यातील फरक नागरिकांना सहज कळावा, यासाठी ३१ मार्चला सरकारने आदेश काढला. निळी छटा येईल या प्रमाणात औद्योगिक बर्फात खाण्यायोग्य निळा रंग टाकण्याचे या आदेशात नमूद केले आहे. पुणे आणि परिसरात औद्योगिक बर्फ तयार केला जात असल्याचा दावा उत्पादक करत होते. आता उत्पादकांची भूमिका बदलली असून, कारखान्यांत खाद्य बर्फ तयार होत असल्याचा डंका आता पिटला जात आहे. 

कायदा काय सांगतो? 
औद्योगिक बर्फासाठी आता निळा रंग निश्‍चित केला आहे. खाद्य बर्फाचे उत्पादन, वितरण, विक्री, वाहतूक, साठा यावर एफडीएतर्फे कार्यवाही केली जाईल. औद्योगिक बर्फात निळा रंग नसेल तर तो खाद्य बर्फ समजला जाईल.

निळा बर्फाचा प्रस्‍ताव पुण्याचा 
ऊस, फळांच्या रसात टाकण्यात येणारा  बर्फ खाण्यायोग्य नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) सर्वेक्षणात स्पष्ट झाले. त्यानंतर एफडीएने बर्फ कारखान्यांची तपासणी मोहीम हाती घेतली. हा बर्फ खाण्यासाठी नसून तो औद्योगिक वापरासाठी आहे, अशी भूमिका उत्पादकांनी घेतली. विक्रीनंतर बर्फाचा वापर कसा होतो याची माहिती नसल्याचे उत्पादकांनी ‘एफडीए’कडे स्पष्ट केले. त्यामुळे खाद्य आणि अखाद्य बर्फ सहज ओळखू यावा, यासाठी औद्योगिक बर्फात खाण्यायोग्य निळा रंग टाकण्याचा प्रस्ताव २०१६ मध्ये एफडीएच्या पुणे विभागाचे तत्कालीन सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी राज्य सरकारकडे पाठविला होता. 

तपासणीच्या वेळी या कारखान्यात औद्योगिक बर्फ उत्पादित होत असल्याचे सांगण्यात येत असे; पण आता औद्योगिक बर्फ असेल तर त्यात निळा रंग घालणे बंधनकारक आहे. तसेच, खाद्य बर्फासाठी केंद्र किंवा राज्याचा परवाना आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे खाद्य बर्फासाठी पिण्यायोग्य पाणी वापरले पाहिजे. आता कारखान्यांतील बर्फाचे नमुने घेण्यात येत आहेत.
- शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे

शहरातील कारखान्यांमधून बर्फ उत्पादनासाठी पिण्यायोग्य पाणी वापरले जाते. उणे दहा अंश सेल्सिअस तापमानामुळे बर्फातून जंतुसंसर्गाचा धोका कमी असतो; पण तो कोणत्या ठिकाणी साठवला आणि कसा वापरला जातो, यावर त्याची शुद्धता अवलंबून असते.
- भारत धनकुडे, बर्फ उत्पादक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com