
Governor Ramesh Bais : युवकांच्या रोजगारासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा - राज्यपाल रमेश बैस
पुणे : राज्यातील युवकांना कौशल्ययुक्त करण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (ता.९) पुण्यातील उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीत (यशदा) आज राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इंडस्ट्री मीट’चे (उद्योग बैठक) आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत बोलताना त्यांनी हे आवाहन केले.कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने 'कौशल्य केंद्र आपल्या दारी' या संकल्पनेवर आधारित ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुणे विभागातील उद्योग, उद्योग संघटना, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे कामगार कंत्राटदार आदी सहभागी झाले होते.

या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, या विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. रामास्वामी एन., महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर,
सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, हनिवेल ऑटोमेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, 'एमसीसीआयए'चे महासंचालक प्रशांत गिरबाने, 'सीआयआय'चे कार्यकारी संचालक सौगत राय चौधरी, यशप्रभा ग्रुपचे संचालक अमित घैसास आदी उपस्थित होते.
बैस पुढे म्हणाले, ‘‘प्रगत देशात कुशल कामगारांची मोठी आवश्यकता आहे. युवकांना छोट्या कौशल्याचे प्रशिक्षण दिल्यास ते मोठ्या प्रमाणात रोजगारक्षम होतील. त्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना उद्योगांची साथ आवश्यक आहे. त्यासाठी हे युवक कौशल्ययुक्त होणे आवश्यक आहे.’’
राज्य सरकार युवकांच्या कौशल्य विकासासाठी उद्योगांना सहभागी करेल. यानुसार राज्यातील विविध उद्योगांच्या ठिकाणी १०० कौशल्य केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. शिवाय ग्रामीण भागांत गावांमध्ये ५०० कौशल्य केंद्र स्थापन करण्यासाठी निविदा काढल्या आहेत.
यासाठी उद्योगांनी पुढे यावे, अशी अपेक्षा मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केली. मनीषा वर्मा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राज्यपाल बैस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या ‘फिनिशर प्लॅटफॉर्म’चे उद्घाटन करण्यात आले.
‘राज्यात १४१ सामंजस्य करार’
राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातील विविध उद्योगांसमवेत मिळून १४१ सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येत आहेत. या सामंजस्य करारांमुळे राज्यातील किमान १ लाख युवकांना रोजगार मिळणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.