esakal | इन्मेंट ब्रँडच्या चपला देशातील मेट्रो शहरात
sakal

बोलून बातमी शोधा

inment

इन्मेंट ब्रँडच्या चपला देशातील मेट्रो शहरात

sakal_logo
By
दिलीप कुऱ्हाडे

येरवडा - कैद्यांची ‘सुधारणा व पुनर्वसन’ अंतर्गत मुंबई येथील टेरगस वर्क प्रा.लि. कंपनीच्या सहकार्याने येरवडा मध्यवर्ती कारागृहात चपल निर्मीती युनिट सुरू आहे. येथील चपला पुणे, मुबंईसह हैद्राबाद आणि दिल्ली आदी मेट्रो शहरांमध्ये विक्रीला ठेवल्या असून, लवकरच त्या ‘एक्सपोर्ट’ होणार असल्याची माहिती टेरगसचे दिवेश मेहता यांनी दिली.

मेहता म्हणाले, ‘‘येरवडा मध्यवर्ती कारागृहातील ४२ कैद्यांनी चपल निर्मितीचे प्रशिक्षण घेऊन चांगल्या दर्जाचे चपला निर्मिती करत आहेत. या बदल्यात त्यांना कारागृहाच्या नियमाप्रमाणे कुशल कारागीर म्हणून प्रतिदिन ६१ रूपये मजुरी मिळत आहे. सोमवार ते शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस कारागृहात कंपनी प्रमाणे काम सुरू आहे.’’

कैद्यांनी बनविलेल्या चपला उत्तम असून त्या एक्सपोर्ट दर्जाच्या आहेत. त्यामुळे अशा चपलांच्या बाजारपेठेसाठी चांगले ब्रॅंडीगसाठी ‘इन्मेंट’ हे नाव दिले आहे. त्यामुळे पुण्यातील महात्मा गांधी रस्ता, हैद्राबाद, दिल्ली येथील नामांकीत शोरुमध्ये या चपला विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या चपलांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चपला लवकर विदेशात पाठविण्यासाठी चर्चा सुरू असून, काही महिन्यांत या चपला एक्सपोर्ट करणार असल्याचे मेहता यांनी सांगितले.

मिंडास महेंद्रा कंपनीकडून येरवडा मध्यवर्ती कारागृहातील ३५ कैद्यांना बोलेरो मोटारीच्या इंजिनच्या वायरिंगचे काम मिळाले आहे. टेरगस कंपनीने ४२ कैद्यांना चपला निर्मितीचे काम दिले आहे. यासह कारागृहाबाहेर इस्त्री, मोटारी व दुचाकी वॉशिंगचे काम, शेतीमधील विविध कामे, पालेभाज्या पिकविणे, फर्निचर, वस्त्र निर्मिती आदी विविध उद्योग सुरू आहेत. यामुळे कारागृह प्रशासनाला कोट्यावधी रूपये उत्पन्न मिळत असले तरी कैद्यांमध्ये एक आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. त्यामुळे कैदी बाहेर पडल्यानंतर पुन्हा समाजामध्ये सन्मानाने जीवन जगतील यात शंकाच नाही, असे येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक यु.टी. पवार यांनी सांगितले