महागाईची होरपळ सोसवेना...

‘महागाईमुळं घर कसं चालवायचं या प्रश्‍नापुढं मती अक्षरशः गुंग झालीये. अन्न-वस्त्र-निवारा या गरजा भागवण्यातच खिसा रिकामा होत आहे.
Inflation
InflationSakal
Summary

‘महागाईमुळं घर कसं चालवायचं या प्रश्‍नापुढं मती अक्षरशः गुंग झालीये. अन्न-वस्त्र-निवारा या गरजा भागवण्यातच खिसा रिकामा होत आहे.

- योगिराज प्रभुणे, ब्रिजमोहन पाटील, सम्राट कदम, सनील गाडेकर

पुणे - ‘महागाईमुळं घर कसं चालवायचं या प्रश्‍नापुढं मती अक्षरशः गुंग झालीये. अन्न-वस्त्र-निवारा या गरजा भागवण्यातच खिसा रिकामा होत आहे. महिनाअखेरपर्यंत खर्चाची तोंडमिळवणी कशी करावी, याचं गणित काही केल्या सुटत नाही. या परिस्थितीत बचतीचा विचारही करणं दुरापास्त झाला आहे,’ अशा प्रतिक्रिया सर्वच आर्थिक गटांतील नागरिक देत आहेत. वसतीगृहात राहणार विद्यार्थी, रोजंदारी कामगार, कंपन्यांतील कामगार, सरकारी नोकर, व्यापारी या साऱ्यांची अवस्था फार बिकट झाली आहे. मुलांच्या शाळेची फी भरायची, घरात गॅस संपत आलाय, पाले-भाज्या, डाळी, दूध महागलंय... यांपैकी कोणती वस्तू कमी करायची, असा प्रश्‍न सर्वांनाच पडलाय. महागाईची होरपळ सर्वव्यापी असल्याचं चित्र ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे.

महंगाई डाएन खाए जात है...

आधी लॉकडाऊन, नंतर आलेली मंदी आणि आता महागाई याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. रशिया-युक्रेन युद्धानं महागाईचा वणवा आणखीनच भडकला आहे. त्यात छोटे व्यापाऱ्यांपासून पगारदारारांपर्यंत प्रत्येक जण होरपळत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस महागल्यानंतर सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडायला सुरवात झाली. पुण्यात १ जानेवारी ते १५ एप्रिल या अवघ्या साडेतीन महिन्यांत पेट्रोलचे दर अकरा रुपयांनी वाढले. पेट्रोल आणि डिझेलमध्ये २६ ते ३१ मार्च या प्रत्येक दिवशी दरवाढ झाली. यामुळे सामान्य नागरिकांची कंबर अक्षरशः मोडली.

दाहकता वाढली

उच्च मध्यमवर्गीय, व्यापारी यांना बसणाऱ्या महागाईच्या वणव्याची दाहकताही वाढली आहे. उन्हाळ्यात मसाल्यासाठीच्या मिरचीच्या भावात शंभर ते सव्वाशे रुपयांची वाढ झाली. जीवनावश्यक असलेल्या गव्हासह बहुतांश सर्व अन्न पदार्थांच्या दरात वाढ झाली. त्यातून आतापर्यंत कधी नव्हे, इतकी तंगी जाणवू लागली आहे. त्यात बँकांनी बचतीवरचे व्याजदरही कमी केले. त्यामुळे उच्च मध्यमवर्गीय आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या घरांमध्ये येणाऱ्या उत्पन्नाचे स्रोत कमी झाले. गॅस, तेल, अन्न पदार्थाच्या किमती वाढल्याचा थेट परिणाम म्हणून हॉटेलमधील मेन्यू कार्डचे दर चढले. त्यामुळे कोरोनापूर्वी दर आठ-दहा दिवसांनी होणारे हॉटेलिंग आता पंधरा-वीस दिवसांपर्यंत पुढं ढकललं गेलं. पर्यटनाला कात्री लागली. उन्हाळ्यात जवळची आणि दिवाळीच्या सुटीत परराज्यातील अशा दोन सहली ठरलेल्या. मात्र, या सगळ्याच आता ‘होल्ड’वर गेल्या आहेत. मुलांना शाळेच्या गणवेशाचे दोन ‘सेट’ एका वेळी घ्यायचो आता ते एकापर्यंत मर्यादित ठेवले आहे. अशा पद्धतीने उत्पन्न आणि खर्च याची ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र उच्चमध्यम वर्गात दिसते.

कमी उत्पन्न गट

  • रोजच पेट्रोलचे दर वाढत असतील तर सर्व सामान्यांनी कसे आर्थिक नियोजन करायचे, हा मोठा प्रश्न आहे. यापूर्वी महिन्याला २५०० हजार रुपयांचे पेट्रोल लागत होते. तिथे आता ३००० ते ३५०० रुपये मोजावे लागत आहेत.

  • पेट्रोल, डिझेलचे दर वाढले की भाडेवाढ होते. त्यामुळे किराणा मालाचे दर वाढले, असे सांगितले जाते. त्यात रशिया युक्रेनच्या युद्धाचे कारण देत तेलाचे दर वाढले आहेत. महिन्याला सुमारे पाच ते सात हजार रुपयांचा किराणा लागत होता तिथे आता आठ ते नऊ हजार मोजावे लागत आहेत.

  • सिलिंडरसाठी हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यापेक्षा लाकडावरची चूल पेटवलेली परवडेल. भाजीपाल्यापासून ते औषधांपर्यंत सर्व वस्तूंचे दर वाढले आहेत.

  • शालेय साहित्याच्या किमती वाढल्या. फीदेखील ७ ते १० टक्के वाढली. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता, या खर्चात काटकसर करता येत नाही.

  • महागाई वाढीचे कारण देत १०० रुपयांना मिळणारी चप्पल आता १२० ते १३० रुपयांना मिळते.

  • कोरोनामुळे हॉटेल चालकांचा धंदा बुडाला. त्यात पुन्हा वाढती महागाई, आता प्रत्येक हॉटेल चालकाने दर वाढवले आहेत त्यामुळे शेवटी बाहेर जेवणे ही आता बजेटच्या बाहेर जात आहे.

  • विजेचा वापर कमी आणि बिलाचा भरणा अधिक अशी अवस्था झाली आहे.

मध्यमवर्गीय

  • गेल्या काही दिवसांत इंधन दरवाढीचा सर्वाधिक झटका सहन करावा लागला आहे. जानेवारीपासून पेट्रोलवर करावा लागणारा खर्च सुमारे एक हजार रुपयांनी वाढला आहे.

  • इंधन दरवाढीमुळे सर्वच बाबी महाग झाल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच किराणा मालाच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. इंधन, किराणा आणि भाजीपाला या बाबी मोठा खर्च वाढविणाऱ्या ठरल्या आहेत. या खर्चात किमान २० टक्के वाढ झाली आहे.

  • इंधनाच्या किमतींमुळे सर्वच बजेट कोलमडले आहे. त्यात एलपीजी सिलिंडर देखील भाव खात आहे.

  • कोरोनामुळे उत्पन्नावर परिमाण झालेला असताना खर्च मात्र वाढतच आहे. मला दोन अपत्ये असून त्यांची फी शाळा-कॉलेजने कमी केलेली नाही. शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

  • महागार्इ वाढल्यास चैनीच्या वस्तूंचा वापर थांबवता येतो. मात्र, दैनंदिन गरजेच्या जीवनावश्‍यक वस्तू वापराव्याच लागणार आहे. इंधन, किराणाप्रमाणे या वस्तू देखील महागल्या आहेत. त्यामुळे याबाबींच्या खर्चात किमान एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.

  • इंधनाचे दर वाढल्याने पर्यटन देखील महागले आहे. तर किराणामुळे हॉटेलांतील खाद्यपदार्थांचे दर देखील वाढले आहे. हॉटेलिंगच्या किमतीत सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे गरजेच्‍या वेळीच हॉटेलिंगचा पर्याय स्वीकारला जात आहे.

  • गेल्या दोन वर्षांत विजेचे दर देखील वाढले आहेत. पूर्वी आमचे बिल एक हजार रुपयांच्या घरात होते. आता ते एक हजार ३०० ते दीड हजारांच्या घरात गेले आहे.

उच्च मध्यमवर्गीय

  • आम्ही कारने गावाकडे जायचो, पण आता हा खर्च तीस टक्के वाढला, एका फेरीला ४ हजार रुपये खर्च डिझेलवर होत आहे. घराच्या बाहेर कार घेऊन बाहेर पडताना विचार करावा लागत आहे. शक्यतो बाहेर जाणे टाळतो, गेलो तरी एकाच फेरीमध्ये इतर कामे कसे होतील व इंधनावरील खर्च कमी कसा करता येईल हे पाहिले जाते. ऑफिसला जाण्यासाठी डिझेलचा महिन्याचा खर्च ६ हजारापर्यंत गेला आहे.

  • आम्हाला महिन्याला पाच किलो खाद्यतेल लागते, दुकानात जाऊ तेव्हा पूर्वीपेक्षा तेल महागच झाल्याचे दिसते. त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. मात्र, आरोग्याचा प्रश्‍न असल्याने चांगल्या दर्जाचे तेल विकत घ्यावे लागते. कडधान्य, भाज्याही महागल्या आहेत.

  • गॅसचे दर गेल्या तीन चार महिन्यात भरपूर वाढले आहेत. त्यामुळे स्वयंपाक करताना गॅस वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाते. सहसा एक सिलिंडर दीड महिना जाते.

  • दोन्ही मुलांच्या शाळेची फी १५ टक्क्यांनी वाढली आहे. शाळेसाठीचे इतर साहित्य, स्टेशनरीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे ज्या गोष्टी मुलांना हव्या आहेत त्या आधी घरात आहेत का, दोघांपैकी एकाकडे असेल तर त्याचा वापर दुसऱ्याला करता येतो का, हे पाहिले जाते. वस्तू नसेल तरच नवीन आणली जाते.

  • कपडे, बूट अशा वस्तू आपण रोज घेत नाही, पण बाहेर गेल्यानंतर विनाकारण कपडे व इतर साहित्य खरेदी करणे आता आम्ही टाळतो आहोत. इंधन, किराणा, वीज, मुलांचे खर्च यासह इतर खर्च वाढल्याने त्याचा परिणाम बचतीवर होत आहे.

  • कुटुंबासोबत महिन्यातून दोन वेळा हॉटेलचा जायचो, पण हॉटेलिंगही महागले आहे, त्यामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. कामासाठी बाहेर गेलो तरी बाहेर खाण्याची वेळ येऊ नये यासाठी घरातूनच खाऊन निघतो! हे तब्येतीसाठीही चांगले आहे.

  • वीज पुरवठ्याबद्दल न बोललेलेच बरे. वीज महाग होत आहे, पण विजेचा लपंडाव सुरू आहे, बिलही वाढते आहे.

व्यापारी

  • इंधनाचे दर वाढल्याने माल वाहतूक खर्च वाढला. मार्केट यार्डमध्ये जाण्यासाठी गेल्या वर्षी दोनशे रुपयांच्या पेट्रोल भरल्यावर आठवडाभर पुरायचे आता चार दिवसांमध्ये परत पंपावर जावे लागते.

  • रस्त्यावरचे शेंगदाणेदेखील दहा रुपयांना मिळत नाही. त्याला वीस रुपये द्यावे लागतात. अशा दिवसात दोन वेळच्या जेवणात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे.

  • अनुदान बंद झाले आणि गॅसची किंमतही प्रचंड वाढल्याने दर महिन्याच्या खर्चामध्ये सरळ हजार रुपयांनी वाढ झाली.

  • दोन वर्षे ऑनलाइन शाळा होत्या. या वर्षी आता वह्या, पुस्तके, गणवेश, वाहतूक, शाळेची फी या खर्चाचा बोजा पडणार आहे. शाळांनीही फीमध्येही वाढ झाली आहे.

  • माझा किराणा मालाचा व्यापार आहे. पण, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू मला विकतच घ्याव्या लागतात. त्यातही १५ ते २० टक्के दरवाढ झाली आहे.

  • हॉटेलमध्ये जाऊन जेवण, बाहेर फिरायला जाणे हा तर आता विषयच नाही. कारण, सकाळी सहा वाजता दुकान उघडतो ते रात्री दहाला बंद करतो. यासाठी वेळच नाही.

  • आम्ही छोटे व्यापारी आहोत. छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायीक दराने वीजबिल भरावे लागत आहे. तेथे आम्हाला मोठा फटका बसतो. किराणा मालाच्या दुकानात जास्तीत जास्त वीज वापरासाठी फ्रिज, ट्युबलाईट, फॅन या पेक्षा जास्त काही असणार? पण, त्यासाठी व्यावसायीक दराने वीजबिल येते.

होस्टेलचे विद्यार्थी

  • इंधनवाढीचा परिणाम अप्रत्यक्षपणे महिन्याच्या आर्थिक नियोजनावर झाला आहे. प्रवासासाठी महिन्याला आधी ८०० रुपयांचे पेट्रोल लागायचे आता एक हजार पेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. जवळपास दीडपट वाढ झाली.

  • खानावळीतील जेवण एका थाळी मागे १० टक्क्यांनी वाढले. तसेच नाश्त्याला आधी २० रुपये लागायचे आता ३० रुपये लागतात.

  • थेट परिणाम नाही होत नाही. पण खाद्यपदार्थांची खरेदी आणि खाणावळीत गेल्यावर त्याचे परिणाम नक्की जाणवतात.

  • नेहमी लागणाऱ्या स्टेशनरीच्या खर्चात किरकोळ वाढ झाली

  • काही खरेदी करायचे म्हणजे आधी विचार करावा लागतो. कपड्यांपासून सर्वच वस्तूंवर ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

  • हो, हॉटेलिंगच्या खर्चात ६० ते ७० टक्क्यांनी वाढ झाली. एवढेच काय, आता गावाकडे जाण्यासाठीही विचार करावा लागतो. आठवड्यातील एक दिवस बाहेर हॉटेलमध्ये खाणेही कमी केले आहे.

  • वीजबिलात वाढ झाल्यामुळे खोली भाडे ही वाढले आहे.

दरांचा वाढता आलेख

(आकडे रुपयांत)

वस्तू जानेवारी एप्रिल

पेट्रोल (साधे) १०९.५२ ११९.९७

पेट्रोल (स्पीड) ११२.३५ १२२.८०

डिझेल ९२.३१ १०२.८७

गॅस ९०२.५० ९५२.५०

तेल

(पंधरा किलोतील घाऊक दर)

वस्तू जानेवारी एप्रिल

सोयाबीन १९६५-२०८० २४१५-२५००

पाम तेल १९००-२०२५ २३३५-२४२०

शेंगदाणा २३००-२३३० २७५०-२७५०

डाळी

(एका किलोचे दर रुपयांमध्ये)

वस्तू जानेवारी एप्रिल

तूरडाळ ८२-८५ ८९-९७

मुग डाळ ८३-८७ ९०-९७

हरभरा डाळ ५७-५९ ६०-६५

मटकी डाळ ९५-१०० १०५-११५

उडीद डाळ ८०-९३ ८२-१०२

मसूर डाळ ८४-८६ ८५-८८

राज्य सरकारसह केंद्र सरकारलाही सामान्य माणसाचे काही देणे घेणे राहिलेले नाही. नेत्यांच्या घरातील कोणी रोजंदारीवर जात नाही. त्यामुळे त्यांना आपले दुःख काय समजणार. रोज महागाई वाढत आहे त्यामुळे उत्पन्न वाढते का, याचा विचार केला पाहिजे. जगणे महाग झाले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर गरीब-श्रीमंत याच्यातील दरी वाढत जाणार आहे.

- नितीन रानमाळ, खराडी

कोरोनानंतर एवढ्या झपाट्याने पेट्रोल १२० तर डिझेल १०० रुपये लिटर होर्इल याचा विचार देखील केला नव्हता. त्यामुळे किराणापासून चैनीच्या वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. किमती कितीही वाढल्या तर जीवनावश्यक बाबी वापराव्याच लागणार आहे. त्यामुळे बचत तरी कशात करायची असा प्रश्‍न पडतो. झपाट्याने किंमत वाढत असलेल्या बाबींना शाश्‍वत पर्याय उपलब्ध करून द्यावा.

- योगिता बटवाल, गृहिणी

बाहेर कुठेही खरेदीला गेलो, की दुकानदार पेट्रोल डिझेल महाग झाले आहे म्हणून सर्वकाही महाग झाल्याचे दिसते. त्यामुळे इंधनाच्या दरांवर सर्वांत आधी नियंत्रण आणले पाहिजे. एलआयसी, सोसायटी मेन्टेनन्स, मुलांची फी यांसह इतर गोष्टींसाठी बचत करणे अवघड जात आहे. या महागाईचा फटाका सर्वसामान्य वर्गाला सहन होत नाही, तर गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांची अवस्था यापेक्षा वाईट आहे. त्याचाही विचार झाला पाहिजे.

- स्वाती फाटे, गृहिणी, डीएसके विश्‍व, धायरी

शहरात सिलिंडरच्या किमतीमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये हजार रुपयांपर्यंत वाढ झाली. प्रत्येक जीवनावश्यक गोष्ट महागली. त्यामुळे आता बचत तरी कशा-कशात करायची आणि कशी करायची जीवन जगणं अवघड झालंय. दोन वेळेला खाणं आणि राहाणे हे भागवणेदेखील मुश्कील झाले आहे. कोरोनामुळे दुकान बंद होते. कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. त्यामुळे सगळेच डळमळीत झाले. मोठ्या दुकानांमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे फार मोठे हाल सुरू आहेत.

- महेश खोपडे, व्यापारी

महागाई आणि बेरोजगारीचा अप्रत्यक्ष परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. महिन्याची खरेदी करताना आता विचार करावा लागतो. शैक्षणिक शुल्क आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर खर्च अनिवार्य आहे. त्यामुळं इतर अनावश्यक गोष्टींवरील खर्च जवळजवळ बंद केला आहे.

- वैभव वलवे, संशोधक विद्यार्थी, आयसर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com