मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोन संशयित मारेकऱ्यांविरुद्ध माहिती देणाऱ्यास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि मुंबईच्या विशेष गुन्हे शाखेने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सारंग दिलीप अकोलकर आणि विनय बाबूराव पवार अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी पुण्यात ओंकारेश्‍वर मंदिराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सारंग अकोलकर (वय 35) आणि विनय पवार (वय 35) यांनी दुचाकीवर येऊन डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा संशय आहे. या गुन्ह्याचा तपास सीबीआय आणि मुंबईच्या विशेष गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. संशयित मारेकऱ्यांबाबत कोणाला माहिती मिळाल्यास अथवा आरोपी आढळल्यास संबंधितांनी सीबीआय आणि मुंबईच्या विशेष गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सीबीआयचे अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक एस. आर. सिंग यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालय, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो, विशेष अपराध शाखा, आठवा माळा, सीजीओ कॉम्प्लेक्‍स, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. फोन क्रमांक- 022- 27576820, 022-27576804 आणि इ-मेल आयडी hobscmum@cbi.gov.in यावर तसेच तपासी अधिकारी- एस. आर. सिंग, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो, विशेष अपराध शाखा येथे माहिती देता येईल.

Web Title: Information that the killers of five million